MS-CIT ला प्रतिष्ठेचा SKOCH Award; महाराष्ट्राच्या डिजिटल साक्षरतेला राष्ट्रीय गौरव
गोंदिया : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) च्या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता उपक्रम MS-CIT ला देशातील प्रतिष्ठित SKOCH Award प्रदान करण्यात आला आहे. डिजिटल साक्षरता (Digital Literacy) या श्रेणीत मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान MKCL च्या गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक समावेशन आणि नागरिक सक्षमीकरणाच्या कार्याची देशपातळीवरील दखल असल्याचे मानले जात आहे.
SKOCH Award हा शासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, कौशल्यवृद्धी आणि नागरिकाभिमुख उपक्रमांसाठी दिला जाणारा देशातील मानाचा पुरस्कार आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडण्यामध्ये MS-CIT ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
या पुरस्काराबद्दल MKCL चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, हा सन्मान केवळ MKCL चाच नसून कोट्यवधी विद्यार्थी, त्यांचे पालक, हजारो केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, प्रशिक्षक, नेटवर्क पार्टनर्स, MSBTE, MKCL मधील सर्व सहकारी, संस्थापक मार्गदर्शक आणि महाराष्ट्र शासनाच्या विश्वासाचे फलित आहे. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून महाराष्ट्रात डिजिटल परिवर्तनाची व्यापक चळवळ उभारण्यात यश आले आहे.
महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या ५,००० हून अधिक अधिकृत शिक्षण केंद्रांच्या माध्यमातून MS-CIT ने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार व परवडणारे डिजिटल शिक्षण पोहोचवले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नव्या युगाच्या गरजा लक्षात घेऊन MS-CIT अभ्यासक्रम अधिक आधुनिक करण्यात आला असून त्यामध्ये Artificial Intelligence (AI), Cyber Security, Data Literacy, Cloud Computing तसेच आधुनिक डिजिटल साधनांचा समावेश करण्यात आला आहे.
या राष्ट्रीय सन्मानामुळे महाराष्ट्र अधिक डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि AI-Ready बनविण्याच्या MKCL च्या ध्येयाला नवी प्रेरणा मिळाली असून, राज्यातील डिजिटल साक्षरतेची चळवळ आणखी वेगाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

