रस्ता सुरक्षा मित्र उपक्रमातून ९७ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण!
सडक अर्जुनीच्या शासकीय ITI मध्ये एकदिवसीय कार्यशाळा; अपघात प्रतिबंध व जनजागृतीचा संकल्प
सडक अर्जुनी : रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘सडक सुरक्षा मित्र-२०२६’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सडक अर्जुनी येथे एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी रंभाजी राव बापू दीक्षित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), सडक अर्जुनी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत CoERS, IIT मद्रासच्या प्रशिक्षण पथकातील रस्ता सुरक्षा तज्ज्ञ कर्नल संजीव शर्मा व रणजीत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी हेल्मेट व सीटबेल्टचा अनिवार्य वापर, वाहतूक नियमांचे पालन, अतिवेगाचे दुष्परिणाम, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे महत्त्व या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. तसेच NHAI च्या वतीने अपघातस्थळी पोहोचल्यानंतर कोणती दक्षता घ्यावी आणि अपघातग्रस्तांना मदत कशी करावी, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत शासकीय ITI सडक अर्जुनी येथील एकूण ९७ विद्यार्थ्यांनी MY Bharat पोर्टलवर ‘सडक सुरक्षा मित्र’ स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली. या सर्व विद्यार्थ्यांना एकदिवसीय विशेष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
प्रशिक्षित विद्यार्थी भविष्यात आपल्या परिसरात रस्ता सुरक्षा जनजागृती करणार असून, नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देणे, अपघात प्रतिबंधात्मक उपक्रम राबविणे आणि सुरक्षित प्रवासाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.
या कार्यशाळेचे आयोजन पोलीस अधीक्षक डॉ. लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बस्तवाडे, ITI चे प्राचार्य वासनिक सर व त्यांचे सहकारी शिक्षक, पोलीस उपनिरीक्षक रंजित मट्टामी, अनेशसिंह राठोड तसेच महामार्ग पोलीस विभागाच्या अंमलदारांनी केले. यावेळी NHAI चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
९७ प्रशिक्षित विद्यार्थी म्हणजे रस्ता सुरक्षेच्या जनजागृतीसाठी तयार झालेले ९७ नवे दूत! रस्ते अपघातमुक्त समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची निश्चितच गरज आहे.

