दुय्यम निबंधक कार्यालयात बाहेरील व्यक्तींचा वावर; प्रशासनाचे नियंत्रण कुठे?
शासकीय कार्यालयात खासगी व्यक्तींना कामकाजासाठी बसण्याची परवानगी आहे का? सडक अर्जुनीतील प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह
सडक अर्जुनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात काही बाहेरील व्यक्तींचा नियमित वावर असल्याची बाब समोर येत आहे. शासकीय कार्यालयात अधिकृत कर्मचारी कार्यरत असताना खासगी व्यक्ती कार्यालयात बसून नागरिकांच्या कामकाजात सहभागी होत असतील, तर त्यांना ही परवानगी नेमकी कोणी दिली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दुय्यम निबंधक कार्यालय हे नागरिकांच्या जमीन, प्लॉट, घर खरेदी-विक्री तसेच विविध दस्तऐवजांच्या नोंदणीशी संबंधित महत्त्वाचे शासकीय कार्यालय आहे. या ठिकाणी दररोज ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपल्या महत्त्वाच्या कामांसाठी येत असतात. मात्र, कार्यालयात काही बाहेरील व्यक्तींचा वावर असल्याने त्यांच्या अधिकाराबाबत आणि भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
खासगी व्यक्तींना शासकीय कार्यालयात बसण्याचा अधिकार आहे का?
शासकीय कार्यालयात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला मनमानी पद्धतीने बसून शासकीय कामकाज करण्याचा अधिकार नसतो. मात्र, नोंदणी विभागाच्या नियमानुसार अधिकृत परवानाधारक दस्तऐवज लोकांना ठरावीक अटींनुसार कार्यालय परिसरात काम करण्याची मुभा असू शकते. त्यामुळे सडक अर्जुनी कार्यालयात वावरणाऱ्या व्यक्तींकडे अधिकृत परवाना आहे का, त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी आहे का, याची तपासणी होणे गरजेचे आहे.
नागरिकांच्या कामकाजात बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप?
दस्तऐवज नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना नेमकी कोणती सेवा कोणाकडून मिळते, शासकीय शुल्क किती आहे आणि खासगी व्यक्तींकडून घेतले जाणारे पैसे कोणत्या कोणत्या कामासाठी आहेत, याबाबत स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे. कार्यालयातील अधिकृत कर्मचारी आणि बाहेरील व्यक्ती यांच्यातील कामाची विभागणी काय आहे हे देखील स्पष्ट करावे.
*वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी*
सडक अर्जुनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात वावरणारी बाहेरील व्यक्तीचे नावे त्यांचे परवाने नियुक्ती किंवा अधिकृत परवानगी यांची तपासणी करण्यात यावी. तसेच कार्यालयात नागरिकांसाठी अधिकृत शुल्काचे फलक लावण्यात यावेत. आणि कोणत्याही नागरिकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही यांची दक्षता घ्यावी. जिल्हा निबंधक आणि नोंदणी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.
शासकीय कार्यालय जनतेच्या सेवेसाठी आहे की खाजगी व्यक्तीच्या हस्तक्षेपसाठी? काही व्यक्तींना कार्यालयात बसण्याची परवानगी कोणी दिली? त्यांच्या कामकाजावर नियंत्रण कोणाचे? या प्रश्नाचे उत्तर आता नोंदणी विभागाला देण्याची गरज आहे.
मंगेश सारक निबंधक अधिकारी सडक अर्जुनी
आमच्या कार्यालयात 3 कर्मचारी आहेत शासकीय कार्यालय अशल्यामूडे कुणीही कार्यालयात येऊन बसतात ते साक्षीदार आहे
आम्ही त्यांना ऑफिस ला ठेवला नाही आहे केश घेऊन येतात व बसून राहतात

