डूग्गीपार पोलीस स्टेशनसमोर टवऱ्या सापाला सर्पमित्रांनी दिले जीवदान! सृष्टी फाउंडेशनच्या चार सर्पमित्रांची तत्परता; वन्यजीव संरक्षणाच्या कार्याचे कौतुक

शिक्षा

डूग्गीपार पोलीस स्टेशनसमोर टवऱ्या सापाला सर्पमित्रांनी दिले जीवदान!

सृष्टी फाउंडेशनच्या चार सर्पमित्रांची तत्परता; वन्यजीव संरक्षणाच्या कार्याचे कौतुक

सडक अर्जुनी : दुग्गीपार पोलीस स्टेशनसमोर टवऱ्या साप आढळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सृष्टी फाउंडेशन सडक अर्जुनीच्या सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितपणे पकडून त्याचे प्राण वाचविले.

साप दिसताच नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. अशा परिस्थितीत सर्पमित्रांनी कोणतीही घाईगडबड न करता कौशल्याने सापाला ताब्यात घेतले. त्याला कोणतीही इजा होऊ न देता सुरक्षितरीत्या हाताळण्यात आले. त्यामुळे एका वन्यजीवाचा जीव वाचविण्यात सर्पमित्रांना यश आले.

या मोहिमेत अमोल कावळे, सचिन शाहारे, आरजू वारखडे आणि मनीष बनसोड या सर्पमित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

आजच्या काळात साप दिसताच त्याला मारण्याची प्रवृत्ती अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र साप हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सृष्टी फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी केलेली ही कामगिरी वन्यजीव संरक्षणाचा सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *