पतीच्या मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी पत्नीने दिली १३ लाखांची सुपारी! बोहारणी येथील वर्षा तुरकर हत्याकांडाचा गोंदिया पोलिसांनी केला उलगडा; पत्नींसह चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोन आरोपी फरार

शिक्षा

पतीच्या मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी पत्नीने दिली १३ लाखांची सुपारी!

बोहारणी येथील वर्षा तुरकर हत्याकांडाचा गोंदिया पोलिसांनी केला उलगडा; पत्नींसह चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोन आरोपी फरार

गोंदिया : जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोहारणी गावाजवळ घडलेल्या वर्षा तुरकर हत्याकांडाचा अखेर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून पत्नीनेच पतीच्या मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

मृतक वर्षा धुरनलाल तुरकर (वय ३५, रा. धानोरे, जि. पुणे) या दिवाळीच्या सुट्टीसाठी आपल्या माहेरी मौजा किंजर्ला, ता. खैरलांजी, जि. बालाघाट येथे आल्या होत्या. दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्या गोंदिया येथील मित्र निलेश अग्रवाल यांच्यासोबत तिरोडा येथे गेल्या होत्या. तेथून परत येत असताना बोहारणी गावाजवळील शिवमंदिर परिसरातील जंगलात सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान अज्ञात तीन इसमांनी वर्षा यांच्यावर हल्ला करून दगडाने व पाठीमागून चाकूने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली.

या घटनेप्रकरणी दवनीवाडा पोलीस ठाण्यात दिनांक १५ नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गौरव भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पोलिसांनी घटनास्थळापासून तिरोडा, खैरलांजी, बालाघाट ते गोंदिया या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान निलेश अग्रवाल यांची पत्नी मोना अग्रवाल हिचा या हत्याकांडातील सहभाग समोर आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, पती निलेश अग्रवाल याचे वर्षा तुरकर यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याने पत्नी मोना अग्रवाल हिने पतीच्या मैत्रिणीची हत्या करण्याचा कट रचला. यासाठी कुणाल कुंभलकर याच्या मदतीने आरोपींशी संपर्क साधून १३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपींनी वर्षा तुरकर यांचा पाठलाग करून बोहारणी येथील जंगल परिसरात त्यांची हत्या केली.

चार आरोपी ताब्यात, दोघांचा शोध सुरू

या प्रकरणात इमरान करीम शेख (वय २६, रा. संजयनगर, मुंडीपार, गोंदिया), शाहबाज खान फिरोज खान पठाण (वय ३३, रा. सिंधी कॉलनी, गोंदिया), कुणाल श्यामलाल कुंभलकर (वय ३१, रा. साई मंदिर जवळ, सिव्हिल लाईन, गोंदिया) आणि मोना निलेश अग्रवाल (वय ४२, रा. साई मंगलम लॉन समोर, गोविंदपूर रोड, गोंदिया) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक गौरव भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे व त्यांच्या पथकाने केली.

अवघ्या काही दिवसांत हत्याकांडाचा उलगडा केल्याने गोंदिया पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे. मात्र, या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करून हत्येमागील संपूर्ण कटाचे धागेदोरे उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *