दिवाळी सण उत्साहात साजरा करा; मात्र सुरक्षिततेची काळजी घ्या!
गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन
गोंदिया : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित व आनंददायी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिवाळी सणानिमित्त बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार व खरेदी-विक्री होत असते. या गर्दीचा फायदा घेत चोरी, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे तसेच शारीरिक स्वरूपाचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आपल्या मौल्यवान वस्तू व मालमत्तेचे संरक्षण करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तसेच वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. फटाके फोडताना विशेष खबरदारी घ्यावी. आगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्वतःची तसेच आपल्या कुटुंबीयांची सुरक्षितता जपून आनंदाने दिवाळी साजरी करावी, असे आवाहन गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे (भा.पो.से.) यांनी केले आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

