कोसमतोंडीत भरदिवसा घरफोडी; २ लाख ७३ हजारांचा ऐवज लंपास!

शिक्षा

कोसमतोंडीत भरदिवसा घरफोडी; २ लाख ७३ हजारांचा ऐवज लंपास!

नाटकाच्या कार्यक्रमाला गेलेल्या कुटुंबाचे घर चोरट्यांनी फोडले; ४१ ग्रॅम सोन्यासह १ लाख ३० हजारांची रोकड गायब

सडक अर्जुनी 14 नोव्हेंबर : सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल २ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस नोंदीनुसार, कोसमतोंडी येथील विजय सदाशिव पुस्तोडे (वय ४५) हे आपल्या पत्नी व कुटुंबीयांसह गावातील नाटकाच्या कार्यक्रमाला गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडकीतून प्रवेश केला. त्यानंतर घरातील दोन गोदरेज कपाटांचे कुलूप तोडून एका कपाटातील १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम, तर दुसऱ्या कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या मालामध्ये अंदाजे ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने, ज्यांची किंमत १ लाख ४३ हजार ५०० रुपये आहे, तसेच १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.

या प्रकरणी विजय पुस्तोडे यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ५९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) व ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश शेजवळ पुढील तपास करीत आहेत. चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान असून या घरफोडीचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *