दोन वर्षांपासून फेरफारसाठी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या शेंगर यांची पायपीट!

शिक्षा

दोन वर्षांपासून फेरफारसाठी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या शेंगर यांची पायपीट!

जाहीरनामा प्रसिद्ध होऊनही फेरफार प्रलंबित; तहसीलदार व महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

सडक अर्जुनी : हक्काच्या पैशाने खरेदी केलेल्या मालकीच्या जागेचा फेरफार करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारूनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप जगदीशसिंग रामपुकारसिंग शेंगार यांनी केला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करून तसेच चौकशीचे आदेश काढूनही फेरफार न झाल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वडिलांनी खरेदी केलेली जागा, फेरफारासाठी मुलाची दोन वर्षांपासून धावपळ

प्राप्त माहितीनुसार, सडक अर्जुनी येथील जगदीशसिंग रामपुकारसिंग शेंगार यांच्या वडिलांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी जुना गट क्रमांक १६० (नवीन गट क्रमांक ३२१/२) मधील प्लॉट क्रमांक ०२ नोंदणीकृत खरेदीखत क्रमांक १०९/१९८७ अन्वये खरेदी केला होता. त्यानंतर १९९० मध्ये वडिलांचे, तर २०२० मध्ये आईचे निधन झाले.

पालकांच्या निधनानंतर मालमत्तेचा फेरफार करण्यासाठी जगदीशसिंग शेंगार यांनी तहसील कार्यालयात अर्ज व पाठपुरावा सुरू केला. मात्र, दोन वर्षे उलटूनही फेरफाराची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

चौकशीचे आदेश, तलाठ्यांचा अहवाल; तरीही निर्णयाची प्रतीक्षा

फेरफार प्रकरणी चौकशीचे आदेश काढण्यात आले होते. तलाठ्यांनी अहवाल सादर केल्यानंतरही महसूल अधिकारी व तहसीलदारांकडून कोणतेही ठोस प्रत्युत्तर मिळत नसल्याचा आरोप शेंगार यांनी केला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतरही फेरफार प्रलंबित असल्याने संबंधित कुटुंबाला प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर आता जगदीशसिंग शेंगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून फेरफार प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी होण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष कोण देणार?

मालमत्तेच्या फेरफारासाठी सामान्य नागरिकाला वारंवार तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असतील, तर महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. संबंधित प्रकरणात तहसील प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे? फेरफार प्रलंबित राहण्याचे नेमके कारण काय? याबाबत प्रशासनाने स्पष्टता देणे आवश्यक आहे.

जगदीश शेंगार यांची मागणी : शेंगार यांच्या फेरफार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कागदपत्रांनुसार नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाची सद्यस्थिती स्पष्ट करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *