ब्राम्हणी खडकीत नाल्या तुंबल्या; दुर्गंधी व डासांच्या प्रादुर्भावाने ग्रामस्थ त्रस्त!
दोन दिवसांवर मंडई, मात्र गावात अस्वच्छतेचे साम्राज्य; ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
सडक अर्जुनी : गावातील नाल्या तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा पूर्णपणे ठप्प झाला असून, ठिकठिकाणी घाण पाणी साचून दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांसह संपूर्ण गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांवर गावातील मंडईचे आयोजन असताना गावात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
गावातील नाल्यांच्या मधोमध माती टाकण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूंच्या नाल्यांमध्ये सांडपाणी साचून राहिले आहे. परिणामी घाण पाण्याला उग्र वास येत असून डासांची उत्पत्ती वाढत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना घरात राहणेही कठीण झाले आहे. साचलेल्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय गावातील हनुमान मंदिराजवळील पाण्याची टाकी ग्रामपंचायतीने पाडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. एकीकडे पाणीटंचाईची समस्या तर दुसरीकडे गावभर नाल्यांमधील घाण पाणी आणि दुर्गंधी, अशा दुहेरी संकटाचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे.
याबाबत गावातील रवी शिवणकर (महाजन) यांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांवर गावाची मंडई आली असतानाही ग्रामपंचायतीने नाल्यांमध्ये टाकलेली माती हटवून सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
मंडईपूर्वी तातडीने स्वच्छता करा!
ग्रामपंचायतीने तातडीने नाल्यांमधील माती व अडथळे हटवून साचलेले घाण पाणी साफ करावे, संपूर्ण नाल्यांची स्वच्छता करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा तसेच गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी रवी शिवणकर (महाजन) यांनी केली आहे.

