राका गावात वीज वितरण कंपनीचा कारभार अंधारात; लाईनमन बेपत्ता, शेतकरी वाऱ्यावर

शिक्षा

राका गावात वीज वितरण कंपनीचा कारभार अंधारात; लाईनमन बेपत्ता, शेतकरी वाऱ्यावर

महिनाभरापासून लाईनमनचा पत्ता नाही; पंधरा दिवसांपासून डीपी बंद, धानपिक संकटात — वीज कंपनीच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप

गोंदिया 

 सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील राका गावात वीज व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे. गावात कार्यरत असलेला लाईनमन तब्बल महिनाभरापासून बेपत्ता असल्याचे सांगितले जात असून, वीज यंत्रणेची देखभाल आणि बिघाड दुरुस्त करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

लाईनमन नाही, दुरुस्ती नाही; मग वीज बिलांची वसुली मात्र वेळेवर कशी? असा थेट सवाल आता शेतकरी करीत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत शेतातील अनेक विद्युत खांब तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यातच मागील पंधरा दिवसांपासून काही डीपी बंद असल्याने अनेक शेतांमधील वीजपुरवठा ठप्प आहे. धानपिकाला पाण्याची गरज असताना वीजच नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, या गंभीर प्रश्नाची माहिती शाखा अभियंता मोटणकर यांना अर्जाद्वारे देण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, तक्रार करूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत तक्रार पोहोचते, पण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज का पोहोचत नाही? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

पावसाळ्यात तुटलेले विद्युत खांब, बंद डीपी आणि नियमित देखभालीसाठी लाईनमन उपलब्ध नसणे, ही परिस्थिती केवळ गैरसोयीची नाही तर गंभीर सुरक्षेचा प्रश्नही बनला आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच वीज वितरण कंपनी जागी होणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.

वीज बिल वसुलीसाठी यंत्रणा तत्पर; मात्र बिघाड दुरुस्त करण्याची वेळ आली की यंत्रणा गायब! अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे. शेतकऱ्यांकडून नियमित वीजबिल वसूल करणाऱ्या कंपनीने त्यांना सुरळीत व सुरक्षित वीजपुरवठा देण्याची जबाबदारीही पार पाडावी, अशी मागणी होत आहे.

धानपीक धोक्यात असताना वीज वितरण कंपनीने आणखी किती दिवस डोळेझाक करायची? राका गावातील बंद डीपी तातडीने सुरू करा, तुटलेले खांब व विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करा आणि कायमस्वरूपी लाईनमनची नियुक्ती करा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.

अन्यथा वीज वितरण कंपनीच्या निष्क्रिय कारभाराविरोधात ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *