केसलवाडा येथे महिला शक्तीचा जल्लोष!
‘उमेद’ अंतर्गत समृद्ध महिला प्रभाग संघ शेंडा यांच्या ‘फिट इंडिया खेळ’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सडक अर्जुनी : महिलांच्या उत्साहाने आणि जल्लोषाने केसलवाडा येथील मैदान अक्षरशः दणाणून गेले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत समृद्ध महिला प्रभाग संघ, शेंडा यांच्या वतीने आयोजित ‘फिट इंडिया खेळ’ उपक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या खेळाडूवृत्तीचा आणि आत्मविश्वासाचा दमदार परिचय दिला.
रनिंग, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच यासोबतच मिरची बॉटल, सुई-दोरा, चमचा-गोळी अशा विविध मनोरंजक खेळांनी कार्यक्रमाला रंगत आणली. मैदानावर प्रत्येक खेळात महिलांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. विजयासाठी प्रयत्न करतानाच एकमेकींना प्रोत्साहन देत महिलांनी ‘महिला शक्तीचा जल्लोष’ साकारला.
या उपक्रमातून केवळ मनोरंजन न करता महिलांचे आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, संघभावना आणि सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून व्यायाम व खेळांना महत्त्व द्यावे, यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक अतुल मुटकुरे, सुहास परशुरामकर, समृद्ध प्रभाग संघाच्या अध्यक्षा लता ताई उरकुडे, कोषाध्यक्ष लक्ष्मी ताई उईके यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच लिभाष घरडे, दयानंद फुलझले, कोमल चांदेवार यांच्यासह विविध कॅडर, आयसीआरपी, लेखापाल, एफएलसीआरपी, कृषी सखी, पशुसखी, बँक सखी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे केसलवाडा येथील हा उपक्रम केवळ ‘खेळ’ न राहता महिला सक्षमीकरण आणि आरोग्य जनजागृतीचा प्रभावी मंच ठरला. खेळाच्या मैदानातून महिलांनी ‘आम्ही सक्षम आहोत, आम्ही फिट आहोत’ असा संदेश दिला.

