10 वर्ष सेवा… कोरोनात जीव धोक्यात; कायम करण्याऐवजी हिंद लॅब बंद – कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला
हिंद लॅब चे कर्मचारी उतरणार रस्त्यावर
गोंदिया, प्रतिनिधी :
गेल्या दहा वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या महालेब अंतर्गत कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची रक्त तपासणी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याऐवजी सरकारने थेट लॅब बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम केले. कोविडसारख्या भीषण संकटातही त्यांनी भीती न बाळगता रुग्णांचे रक्तनमुने गोळा करून तपासणी केली. मात्र इतकी सेवा करूनही आज त्यांच्या हातात बेरोजगारीच आली आहे.
लॅब बंद झाल्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी प्रभावित झाले असून, अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह संकटात सापडला आहे. “कायम करण्याऐवजी आमच्यावर उपासमारीची वेळ आणली,” असा तीव्र आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे—
“सरकारने हा निर्णय तात्काळ बदलला नाही, तर गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील.”
कोविड काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना असा न्याय मिळत असेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांतूनही उमटत आहे. आता शासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

