राजगुड्यात दुग्गीपार पोलिसांची धडक कारवाई!
5500 रुपयाचा मुद्देमाल
दोन ठिकाणांहून ५५ किलो मोहफुलांचा साठा जप्त करून नष्ट:
दारूबंदी लागू असतानाही अवैध दारूविक्रीचा संशय; महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
सडक अर्जुनी : तालुक्यातील राजगुडा येथे दारूबंदी लागू असतानाही अवैध दारूविक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावातील अवैध दारूविक्रीविरोधात दारूबंदी करणाऱ्या महिलांनी तक्रार केल्यानंतर, आज २७ ऑक्टोबर रोजी दुग्गीपार पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ५५ किलो मोहफुलांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. या मोहफुलांची किंमत ५ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगुडा गावात मोहफुलांचा साठा असल्याची तक्रार दारूबंदी करणाऱ्या महिलांनी दुग्गीपार पोलिसांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत दुग्गीपार पोलीस ठाण्याचे बीट जमादार विजय कोटांगले आणि पोलीस शिपाई वंदू शिवणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पहिल्या ठिकाणी अतुल वैद्य यांच्या घरी तपासणी केली असता ३० किलो मोहफुले, अंदाजे किंमत ३ हजार रुपये, आढळून आली. तर दुसऱ्या ठिकाणी प्रमोद ईडपाते यांच्या घरी २५ किलो मोहफुले, अंदाजे किंमत २ हजार ५०० रुपये, आढळून आली. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणांहून एकूण ५५ किलो मोहफुलांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार विजय कोटांगले आणि पोलीस शिपाई वंदू शिवणकर यांनी केली. यावेळी गावातील दारूबंदी समूहाच्या महिला उपस्थित होत्या.
दारूबंदीनंतर पोलिसांची तिसरी कारवाई
राजगुडा गावात दारूबंदी लागू झाल्यापासून दुग्गीपार पोलिसांनी केलेली ही तिसरी कारवाई असल्याची माहिती समोर आली आहे. गावात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि अवैध दारूविक्रीला आळा बसावा, अशी मागणी दारूबंदी समूहातील महिलांकडून होत आहे.
आता या कारवाईनंतर गावातील अवैध दारूविक्रीला कितपत आळा बसतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

