रेती वाहतूक करणाऱ्या १३ बैलबंड्यांवर कारवाई सडक अर्जुनी, कोहमारा, केसलवाड्यात महसूल विभागाची धडक मोहीम; बैलबंड्या तहसील कार्यालयात जमा

शिक्षा

 

रेती वाहतूक करणाऱ्या १३ बैलबंड्यांवर कारवाई

सडक अर्जुनी, कोहमारा, केसलवाड्यात महसूल विभागाची धडक मोहीम; बैलबंड्या तहसील कार्यालयात जमा

सडक अर्जुनी | प्रतिनिधी

सडक अर्जुनी : तालुक्यात गौण खनिजाच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ ऑक्टोबर रोजी सडक अर्जुनी, कोहमारा आणि केसलवाडा येथे रेती वाहतूक करणाऱ्या एकूण १३ बैलबंड्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे तालुक्यातील रेती वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सडक अर्जुनी येथील शिवमंदिर परिसरात रेती वाहतूक करणाऱ्या पाच बैलबंड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर कोहमारा येथे तीन, तर केसलवाडा येथे आणखी पाच बैलबंड्यांवर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १३ बैलबंड्यांवर कारवाई करून त्या तहसील कार्यालय, सडक अर्जुनी येथे जमा करण्यात आल्या.

तलाठी पथकाची धडक मोहीम

तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मयूर थोरवे, आंबेकर, विकी पवनकर आणि सूरज नागरे यांनी ही कारवाई केली. गौण खनिजाच्या वाहतुकीवर लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी महसूल विभागाने ही मोहीम राबविली.

माहिती मिळताच गौण खनिज जप्तीची कारवाई!

या कारवाईबाबत तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “आम्ही गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या बैलबंडी चालकांवर कारवाई केली आहे. बैलबंडीद्वारे गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यास, आम्ही गौण खनिज जप्तीची कारवाई करू,” असे त्यांनी सांगितले.

पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

तालुक्यात गौण खनिजाची वाहतूक नियमांनुसार होत आहे की नाही, यावर महसूल प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. सडक अर्जुनी, कोहमारा आणि केसलवाडा येथे झालेल्या या कारवाईनंतर भविष्यात अशा वाहतुकीविरोधात प्रशासनाकडून आणखी कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *