एकाच रात्री खड्ड्यामुळे चार दुचाकीस्वारांचे अपघात! दोन चालकांची प्रकृती चिंताजनक; NH-53 वरील एक्वा वॉटर पार्कसमोरील घटना

शिक्षा

एकाच रात्री खड्ड्यामुळे चार दुचाकीस्वारांचे अपघात!

दोन चालकांची प्रकृती चिंताजनक; NH-53 वरील एक्वा वॉटर पार्कसमोरील घटना

सडक अर्जुनी : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील एक्वा वॉटर पार्क, डुग्गीपारसमोर महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे एकाच रात्री तब्बल चार मोटारसायकलस्वार अपघातग्रस्त झाल्याची घटना दि. 28 सप्टेंबर रोजी घडली. या अपघातांमध्ये दोन चालकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या दरम्यान डोंगरगाव डेपो येथील माहुली ढाब्याचे संचालक दिलीप बोरकर (वय अंदाजे 45 वर्षे) यांची मोटारसायकल या खड्ड्यात गेल्याने त्यांचा अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांच्या तोंडाला व डोक्याला जबर मार लागला.

या घटनेनंतर काही वेळातच खडकी येथील सुखदेव ब्राह्मणकर महाराज (वय अंदाजे 47 वर्षे) यांची मोटारसायकलही त्याच खड्ड्यात गेली. त्यांना डोक्याजवळील भागासह पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर खुर्सीपार येथील एका मोटारसायकल चालकाचाही याच खड्ड्यात अपघात झाला. देवरीच्या दिशेने जाणाऱ्या आणखी एका दुचाकीस्वारालाही याच खड्ड्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागले. त्यामुळे अवघ्या 2 ते 3 तासांच्या कालावधीत चार मोटारसायकल अपघात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

खड्डा पडला कशामुळे?

महामार्गावरील हा मोठा खड्डा शेतातून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे पडला की एक्वा वॉटर पार्कच्या पाण्यामुळे, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तात्काळ सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

प्रशासन निद्रिस्त आहे का?

एकाच खड्ड्यामुळे काही तासांत चार दुचाकीस्वारांचे अपघात झाल्याने महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासन व महामार्ग यंत्रणेने या खड्ड्याची तातडीने पाहणी करून तो बुजवावा तसेच वाहनचालकांना धोक्याची सूचना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आणखी किती अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? असा संतप्त सवाल वाहनचालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *