नवीन टोला-बामणी खडकी येथे भव्य ओपन कबड्डी स्पर्धेचा थरार!
२२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान कबड्डीचा धुरळा; २७ नोव्हेंबरला ‘अंधारलेल्या वाटा’ नाटकाचा मोफत प्रयोग
बामणी खडकी : ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तरुण उत्साही क्रीडा व नाट्य कला मंडळ, नवीन टोला-बामणी खडकी यांच्या वतीने भव्य प्रौढ ओपन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २२, २३ व २४ नोव्हेंबर २०२६ रोजी ही स्पर्धा रंगणार असून, कबड्डीच्या मैदानात खेळाडूंचा जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी पंचायत समिती उपसभापती विलास शिवणकर व प्रगतिशील शेतकरी प्रवीण तवाडे यांच्या हस्ते होणार असून, सहउद्घाटक म्हणून बामणीचे उपसरपंच विकास खोटेले उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन गोपाल जमदाड व कैलास उईके करणार आहेत.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक १० हजार रुपये सय्यद सलाम शेख (नागपूर) यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये ललित डोंगरवार यांच्याकडून, तर तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये इरसात पठाण यांच्याकडून देण्यात येणार आहे.
याशिवाय विलास शिवणकर यांच्याकडून ७,००१ रुपये, मदन उईके, गोपाल जमदाड व महेंद्र चूटे यांच्याकडून ५,००१ रुपये, राजेंद्र जैन (भारत पेट्रोल पंप, बामणी) यांच्याकडून ३,००१ रुपये, प्रवीण तवाडे यांच्याकडून २,००१ रुपये तसेच हार्दिक ब्राह्मणकर (इंजिनिअर व कंत्राटदार, सडक अर्जुनी) यांच्याकडून २,००१ रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेची प्रवेश फी ४५० रुपये असून तक्रार फी १,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. प्रवेश फी स्वीकारण्याची जबाबदारी अजय टेकाम, राहुल शेळमते, राहुल कुंभरे व योगेश जमदाड यांच्याकडे देण्यात आली आहे.
दरम्यान, खास मंडईनिमित्त २७ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘अंधारलेल्या वाटा’ या नाटकाचा मोफत प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे कबड्डीच्या थरारासोबतच नाट्यरसिकांनाही मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष संदेश इडपाते, उपाध्यक्ष कैलास उईके, परमानंद वटी, रणजीत सोडी, मनोज सोडी, अजय टेकाम व संपूर्ण खेळाडूवर्ग यांच्या पुढाकारातून या भव्य क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवावी व आपल्या खेळाचे कौशल्य दाखवावे, असे आवाहन तरुण उत्साही क्रीडा व नाट्य कला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

