माकडाचा महिलेवर जीवघेणा हल्ला; महिलेचा पाय फ्रॅक्चर!
पडसगाव-राका परिसरात जंगली माकडांचा उच्छाद; वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
सडक अर्जुनी | प्रतिनिधी
तालुक्यातील जंगलालगतच्या गावांमध्ये जंगली माकडांचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पडसगाव-राका गावातील एका महिलेवर जंगली माकडाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुकेशनी अशोक नेवारे (वय ३३ वर्षे) या महिला आपल्या घराच्या छतावरील स्लॅब वर बसलेल्या माकड बसला असताना त्याला भागवायला गेले असता अचानक एका जंगली माकडाने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असून पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलातील माकडांचा गावांमध्ये वाढता वावर नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे चित्र दिसून येत आहे. घराच्या परिसरातही नागरिक सुरक्षित नसतील, तर वनविभाग नेमकी कोणती उपाययोजना करीत आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
वनविभागाने आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहू नये!
संबंधित जंगली माकडाचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना या धोक्यातून मुक्त करावे. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्या सुकेशनी नेवारे यांना वनविभागामार्फत नियमानुसार त्वरित आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी पडसगाव-राका येथील ग्रामस्थांनी केली आहे.

