डोंगरगाव बफर क्षेत्रात रेतीची खुलेआम चोरी! डोंगरगावपासून खुर्सीपारपर्यंत रेती वाहतुकीचे जाळे? वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मुख्यालय जवळच, तरीही अवैध व्यवसायावर नियंत्रण का नाही?

शिक्षा

डोंगरगाव बफर क्षेत्रात रेतीची खुलेआम चोरी!

डोंगरगावपासून खुर्सीपारपर्यंत रेती वाहतुकीचे जाळे? वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मुख्यालय जवळच, तरीही अवैध व्यवसायावर नियंत्रण का नाही?

सडक अर्जुनी | प्रतिनिधी

सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव डिपो बफर क्षेत्रात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी व वाहतूक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे, डोंगरगाव डिपो येथे बफर क्षेत्रातील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे मुख्यालय असतानाही रेती चोरीचा हा प्रकार सुरू असल्याने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डोंगरगाव बफर क्षेत्रापुरताच हा प्रकार मर्यादित नसून, परिसरातील डोंगरगाव, सालेधारणी, खडकी, पुतळी, कोयलारी, प्रधानटोला, सतीटोला, शेंडा आणि खुर्सीपार या गावांच्या परिसरातूनही मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण परिसरात रेती वाहतुकीचा नेमका प्रकार काय आहे? वाहतूक अधिकृत परवानगीने सुरू आहे की अवैधरीत्या रेतीची लूट केली जात आहे? याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

अधिकाऱ्यांच्या नाकाखाली रेती तस्करी?

महसूल आणि वनविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कथित संगनमतामुळेच हा अवैध व्यवसाय सुरू आहे का, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेतीची वाहतूक होत असल्याची चर्चा असून, बफर क्षेत्रात ट्रॅक्टरच्या सततच्या आवाजामुळे वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील शांतता भंग होत आहे. वन्यजीवांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या वनविभागाकडून या प्रकारावर प्रभावी नियंत्रण का ठेवले जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

वनविभाग आणि महसूल विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात!

बफर क्षेत्रात रेती चोरी व वाहतूक होत असल्याची माहिती समोर येत असतानाही वनविभागाकडून ठोस कारवाई होताना दिसत नसल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे महसूल विभागही या प्रकारावर प्रभावी कारवाई करताना दिसत नसल्याने दोन्ही विभागांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, एका ठिकाणी रेती चोरी सुरू असल्याचे पाहून परिसरातील इतर रेती वाहतूकदारही या भागाकडे वळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायाला वेळीच आळा घातला नाही, तर बफर क्षेत्रासह संपूर्ण परिसरातील नैसर्गिक संपत्तीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार की डोळेझाक करणार?

डोंगरगाव बफर क्षेत्रात वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे मुख्यालय असतानाही रात्रीच्या वेळी रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती खरी असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. वनविभागाने रात्रीची गस्त वाढवून संशयित ट्रॅक्टरची तपासणी करावी. महसूल विभागानेही संबंधित गावांतील रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या परवान्यांची तपासणी करावी. तसेच दोन्ही विभागांनी संयुक्त पथक तयार करून संपूर्ण परिसरात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बफर क्षेत्रातील वनसंपत्तीचे रक्षण नेमके कोण करणार? रेतीची चोरी थांबविण्याची जबाबदारी कोणाची? आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुख्यालयाच्या परिसरातच हा प्रकार सुरू असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? आता तरी वरिष्ठ वनाधिकारी आणि महसूल प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *