कोहळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी उद्योगमंत्र्यांना निवेदन नवेगावबांध जलाशयाला ‘कोलू पाटील जलाशय’ नामकरणासह पर्यटन व उद्योग विकासाची

शिक्षा

कोहळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी उद्योगमंत्र्यांना निवेदन

नवेगावबांध जलाशयाला ‘कोलू पाटील जलाशय’ नामकरणासह पर्यटन व उद्योग विकासाची मागणी

गोंदिया : कोहळी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व औद्योगिक विकासासाठी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोहळी समाज विकास मंडळ, जिल्हा गोंदिया यांच्या वतीने महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. ना. उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले व किरण पांडव उपस्थित होते.

दरम्यान, कोहळी समाजाच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये नवेगावबांध जलाशयाचे ‘कोलू पाटील जलाशय’ असे नामकरण करावे, नवेगावबांध परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास करावा, तसेच परिसरात लघु, मध्यम व कृषीपूरक उद्योगांना चालना द्यावी, यांचा समावेश आहे.

याशिवाय कोहळी समाजातील युवकांसाठी कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, युवक व महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, तसेच नवेगावबांध परिसरात कोहळी समाजाच्या इतिहास व सामाजिक योगदानाची माहिती देणारे स्मारक उभारावे, अशा मागण्याही करण्यात आल्या.

कोहळी समाजाच्या या मागण्यांची अंमलबजावणी झाल्यास परिसरातील रोजगारनिर्मिती, पर्यटन विकास, उद्योगवाढ आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे शासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.

निवेदन देतेवेळी उपस्थित

कोहळी समाज केंद्रीय मंडळाचे उपाध्यक्ष अमोल पाटील मुंगमोडे, कोहळी समाज संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष चामेश्वर गहाणे, कोहळी समाज विकास मंडळ गोंदियाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, डाॅ. गजानन डोंगरवार, बिहारी डोंगरवार, जयंत लांजेवार, रामदास बोरकर, हितेंद्र लांजेवार, हरिचंद्र मुंगमोडे, दिलीप लोधी, खुशाल डोंगरवार, विलास कापगते व अशोक परशुरामकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *