गोंदिया शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीला अवघ्या ४ तासांत अटक!

शिक्षा

 

गोंदिया शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!

  1. घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीला अवघ्या ४ तासांत अटक!

चोरीचे २ लाख ६९ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत; गोंदिया शहर पोलिसांना मोठे यश

गोंदिया : घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला गोंदिया शहर पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला असून, गोंदिया शहर पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी अनिता देवेंद्र राऊत (वय ४५, रा. गोविंदपूर, आंबेडकर वॉर्ड, गोंदिया) या २५ ऑक्टोबर २०२६ रोजी बाहेरगावी गेल्या होत्या. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी त्या घरी परतल्या. दरम्यान, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी घरातील बेडरूममध्ये असलेल्या पलंगाच्या खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या कानातील बाळ्या, एक जोड कानाचे झुमके, सोन्याची नथ, तीन नग सोन्याचे पानपेंडल, एक मंगळसूत्र, काळ्या मण्यांसह ११ लहान व ४ मोठे मणी, एक अंगठी तसेच काळ्या पोतीसह ३२ मणी अशा दागिन्यांचा समावेश होता. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे २ लाख ६९ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर फिर्यादीने गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास मपोउपनि. प्रियांका बेस यांच्याकडे सोपविण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आंबेडकर चौक, जोगळेकर वॉर्ड, गोंदिया येथील आशापाली किशोर गणवीर (वय ३३) हिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी महिला आरोपीला अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले २ लाख ६९ हजार रुपये किमतीचे संपूर्ण दागिने हस्तगत केले. अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक करणे आणि संपूर्ण मुद्देमाल परत मिळवणे ही गोंदिया शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. गौरव भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच गोंदिया शहर पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण बोरकुटे, डी.बी. पथकाच्या मपोउपनि. प्रियांका बेस, सपोनि./कवळपालसिंग भाटिया, पोहवा. सुदेश ढेमरे, पोहवा. निशिकांत लोंढारे, पोहवा. कमलेश शहारे, पो.शि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावत, प्रमोद शेंडे, सोनू नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे व राकेश डोंगरवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत उलगडा झाला आणि चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले. गोंदिया शहर पोलिसांची ही कामगिरी निश्चितच प्रशंसनीय आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *