सेवा संकल्प अभियानांतर्गत मुलींच्या वसतिगृहात आरोग्य शिबिर कोहमारा येथील तुळशीनगरमधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात विविध आरोग्य तपासण्या

शिक्षा

सेवा संकल्प अभियानांतर्गत मुलींच्या वसतिगृहात आरोग्य शिबिर

कोहमारा येथील तुळशीनगरमधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात विविध आरोग्य तपासण्या

कोहमारा, दि. १४ ऑक्टोबर २०२६ :

उपकेंद्र डुग्गीपार येथील आरोग्य पथकाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता कोहमारा येथील तुळशीनगर परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून वसतिगृहातील मुलींच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

या शिबिरात वसतिगृहातील मुलींचे वजन मोजणे, सिकल सेल सोल्युबिलिटी टेस्ट, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब (बीपी), रक्तातील साखरेची तपासणी, मलेरिया तपासणी, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध तपासण्यांच्या माध्यमातून मुलींच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यास मदत झाली.

या आरोग्य शिबिरात समुदाय आरोग्य अधिकारी कु. कुमुदिनी हटवार, आरोग्य सेविका कु. एस. जी. मानकर, आरोग्य सेवक श्री. पराग भगत, आशा वर्कर योगिता कुरुसुंगे, आशा वर्कर विद्या उंदिरवाडे आणि परिचर सौ. लक्ष्मीबाई लांजेवार यांनी सहभाग घेतला.

तसेच वसतिगृहाच्या वार्डन श्रीमती नादिरा नंदेश्वर आणि गार्ड कु. मंजुषा वैद्य यांनीही शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले.

विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेणे, आजारांचे वेळीच निदान करणे आणि आरोग्य तपासणीबाबत जागरूकता निर्माण करणे, या दृष्टीने सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेले हे आरोग्य शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *