घोटी येथे ‘सेवा संकल्प’ आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न!
रक्तदाब, मधुमेह, ईसीजीसह विविध आजारांची तपासणी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
घोटी, प्रतिनिधी |
सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा घोटी येथे १३ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायत घोटी अंतर्गत दुर्गा उत्सव मंडपात ‘सेवा संकल्प’ आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणित पाटील तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा बनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला.
या शिबिरात नागरिकांची उच्च रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, मलेरिया आणि कुष्ठरोग यांसह विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली. तसेच क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली असून, संशयित रुग्णांची तपासणी करण्याची मोहीमही राबविण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि आजारांचे वेळेत निदान करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
आरोग्य पथकाची उपस्थिती
शिबिरप्रसंगी सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. मयुरी पटले CHO.वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (क्षयरोग) देवेंद्रजी भाजीपाले, आरोग्य सेवक उमेश बागडकर, आरोग्य सेविका कु.वर्षा गेडाम ANM तसेच आशा सेविका उपस्थित होत्या.
नागरिकांना आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाचा लाभ मिळाल्याने ‘सेवा संकल्प’ आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

