नवीनटोला-ब्राम्हणी खडकी येथे आज मंडईनिमित्त ‘अंधारलेल्या वाटा’ नाटकाचा मोफत प्रयोग!
दारूच्या व्यसनामुळे संसार कसा उद्ध्वस्त होतो, याचे प्रभावी चित्रण; परिसरातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे मंडळाचे आवाहन
सडक अर्जुनी : दिवाळी सणानंतर ग्रामीण भागात मंडई आणि नाट्यप्रयोगांची परंपरा मोठ्या उत्साहात सुरू होते. याच परंपरेला अनुसरून नवीनटोला-ब्राम्हणी खडकी येथे मंडईनिमित्त आज शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘संगीत अंधारलेल्या वाटा’ या तीन अंकी नाटकाचा भव्य मोफत प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
तरुण उत्साही नाट्य व क्रीडा मंडळ, नवीनटोला-ब्राम्हणी खडकी यांच्या सौजन्याने माता माऊलीच्या भव्य पटांगणावर बंदिस्त शामियान्यात हा नाट्यप्रयोग रंगणार आहे. रंगतरंग थिएटर, वडसा प्रस्तुत ‘संगीत अंधारलेल्या वाटा’ हे नाटक परिवारावर आधारित असून, दारूच्या व्यसनामुळे एखाद्या कुटुंबाचा संसार कशाप्रकारे उद्ध्वस्त होतो, व्यसनाधीनतेमुळे कुटुंबातील सदस्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते, याचे वास्तववादी आणि प्रभावी चित्रण या नाटकातून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास शिवणकर (पंचायत समिती उपसभापती) यांची उपस्थिती राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून विकास खोटले (उपसरपंच, ग्रामपंचायत ब्राम्हणी), लेखलाल टेकाम (उपसरपंच, ग्रामपंचायत राजगुडा), डॉ. प्रणय चुटे, डॉ. अविनाश दोनोडे, डॉ. ईश्वर कोरे, राजू जैन (भारत पेट्रोलियम, ब्राम्हणी), प्रगतिशील शेतकरी प्रवीण तवाडे पाटील तसेच इंजि. हार्दिक ब्राम्हणकर यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे रंगमंच पूजन राजू जैन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
व्यसनमुक्त समाजाचा संदेश देणारा नाट्यप्रयोग!
केवळ मनोरंजन नव्हे, तर समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश देण्याच्या उद्देशाने या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. दारूच्या व्यसनामुळे हसते-खेळते कुटुंब कसे संकटात सापडते आणि संपूर्ण संसाराची वाताहत कशी होते, याची जाणीव करून देणारा हा नाट्यप्रयोग प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह पाहावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन तरुण उत्साही नाट्य व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शामराव चुटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
मंडईनिमित्त आयोजित या मोफत नाट्यप्रयोगाचा परिसरातील नागरिकांनी, महिला-पुरुषांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

