शशिकरण मंदिर व योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टमध्ये चोरी दानपेट्या फोडून रोकडसह पितळी साहित्य लंपास; सीसीटीव्ही केबल तोडून चोरट्यांचा धाडसी प्रकार

शिक्षा

शशिकरण मंदिर व योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टमध्ये चोरी

दानपेट्या फोडून रोकडसह पितळी साहित्य लंपास; सीसीटीव्ही केबल तोडून चोरट्यांचा धाडसी प्रकार

सडक अर्जुनी, दि. 26 जुलै : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील जंगलव्याप्त परिसरात असलेल्या आदिवासी समाजाचे आराध्य दैवत शशिकरण बाबा मंदिर व योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 25 जुलैच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टच्या प्रवेशद्वारावरील ग्रिल तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली. तसेच पितळी दानपेटी व पितळी आरती थाळी असा अंदाजे ₹7 ते ₹8 हजार किमतीचा ऐवज चोरून नेला.

याचवेळी चोरट्यांनी शशिकरण बाबा मंदिराच्या मागील दरवाज्याचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी फोडली. त्यामधील अंदाजे ₹9 ते ₹10 हजारांची रोकड चोरून नेल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

विशेष म्हणजे, चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या केबलही तोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास व चौकशी डुग्गीपार पोलीस करीत आहेत.

मंदिर परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, मंदिर परिसरात कायमस्वरूपी पोलीस गस्त वाढविण्याची तसेच सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *