डोंगरगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
डोंगरगाव, सडक अर्जुनी : 15 ऑगस्ट 2026 रोजी वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरगाव येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण खडकी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. सिंधुताई बारसागडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साईबाबा शेतकरी शिक्षण संस्था, खुर्शीपारचे अध्यक्ष श्री खेमराजजी देशमुख होते.
यावेळी संस्थेचे सचिव श्री वसंतरावजी देशमुख, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य श्री के. के. काशिवार, गावातील आमंत्रित प्रतिष्ठित नागरिक, केंद्रप्रमुख सौ. वासनिक मॅडम, वसंत हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, एम.बी. देशमुख महाविद्यालयातील प्राध्यापक, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक, खडकी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीताचे गायन केले. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन श्री आर. एस. लंजे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री वाय. एच. मानकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.

