डुग्गीपार पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; CEIR तंत्रज्ञानाच्या मदतीने १० हरविलेले मोबाईल शोधले!
मोबाईल हरविल्याच्या तक्रारींची तत्काळ दखल; पोलिसांनी मुळ मालकांच्या हातात दिले मोबाईल
डुग्गीपार : मोबाईल हरविल्यानंतर तो पुन्हा मिळेल की नाही, याची चिंता नागरिकांना सतावत असते. मात्र डुग्गीपार पोलिसांनी या चिंतेला पूर्णविराम देत CEIR पोर्टल आणि सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने तब्बल १० हरविलेले अँड्रॉइड मोबाईल शोधून काढले असून, ते संबंधित मुळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत.
डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे मोबाईल हरविल्याबाबत तक्रारी प्राप्त होताच पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. पारंपरिक तपासासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी सायबर सेल, गोंदिया यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले.
पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले आणि एकूण १० अँड्रॉइड मोबाईल शोधून काढण्यात आले. शोधून मिळालेले मोबाईल संबंधित नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांच्या ताब्यात देण्यात आले. अनेक दिवसांपासून हरविलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
मोबाईल हरवल्यानंतर अनेक नागरिक तक्रार न करता शांत बसतात. त्यामुळे मोबाईल हरवल्यास नागरिकांनी वेळ न दवडता तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन डुग्गीपार पोलिसांनी केले आहे. मोबाईलचा गैरवापर होऊ नये यासाठीही वेळेत तक्रार करणे महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी अभय डोंगरे व उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्रीमती चानपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार कमलेश सोनटक्के, पोहवा जगदीश मेश्राम, पोहवा सुशिल रामटेके, पोना महेंद्र सोनवाने, पोशि उद्देभान रुखमोडे व पोशि गिरीष लांजेवार यांनी परिश्रम घेतले.
हरवलेला मोबाईल शोधून परत मिळवून देत डुग्गीपार पोलिसांनी केवळ कारवाईच केली नाही, तर ‘पोलिस तुमच्या मदतीला आहेत’ हा विश्वासही नागरिकांमध्ये निर्माण केला आहे.

