गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने सुनावली शिक्षा 50 किलो गोमांस जप्त प्रकरण; सडक अर्जुनी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

शिक्षा

गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने सुनावली शिक्षा

50 किलो गोमांस जप्त प्रकरण; सडक अर्जुनी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

गोंदिया : गोमांस विक्री करीत असल्याच्या प्रकरणात आरोपी अक्रम अब्दुल रशीद कुरेशी (वय 43 वर्षे, रा. सडक अर्जुनी) यास सडक अर्जुनी येथील मा. प्रथम श्रेणी न्यायालयाने दोषी ठरवून विविध कलमांन्वये शिक्षा सुनावली.

पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील झोळके यांच्या तक्रारीवरून दिनांक 27 ऑक्टोबर 2019 रोजी आरोपी अक्रम अब्दुल रशीद कुरेशी याच्याविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 77/2019, कलम 429 भा.दं.वि. तसेच प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलीस तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा त्याच्या राहत्या घरी गोमांस विक्री करीत असल्याचे समजल्याने पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला. यावेळी व्होल्टास कंपनीच्या फ्रिजमध्ये अंदाजे 50 किलो गोमांस आढळून आले. याप्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार हरिश्चंद्र शेंडे, ब.नं. 529 यांनी केला. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध मिळालेला सबळ पुरावा व दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.

प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपी अक्रम अब्दुल रशीद कुरेशी यास दोषी सिद्ध झाल्याने मा. प्रथम श्रेणी न्यायालय, सडक अर्जुनीच्या मा. न्यायाधीश प्रियांका काजळे मॅडम यांनी दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी शिक्षा सुनावली.

न्यायालयाने कलम 429 भा.दं.वि. अन्वये 3 वर्षे सक्तमजुरी व ₹25,000 रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. तसेच प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मधील कलम 5(ब) सह कलम 9 अन्वये 3 वर्षे सक्तमजुरी व ₹10,000 रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना सक्तमजुरी, तर कलम 5(क) सह कलम 9(अ) अन्वये 1 वर्ष सक्तमजुरी व ₹2,000 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे कु. पुनम लेकरीया मॅडम व अॅड. ओमप्रकाश गहाणे सर यांनी युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी पोलीस शिपाई ब.नं. 1573, पोलीस स्टेशन डुग्गीपार यांनी केली.

सदर प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डुग्गीपार पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी विशेष लक्ष देऊन प्रभावी तपास व न्यायालयीन पैरवी केली.

या कारवाईस पोलीस अधीक्षक गोंदिया गोरेख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के व पोलीस हवालदार यांनी विशेष लक्ष दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *