गोंड राजाल गोंड राणी ट्रायबल फॅशन शो* *सडक अर्जुनी ठरणार राष्ट्रीय आदिवासी शक्ती केंद्र!
गोंडी समाजाच्या स्वाभिमानाचा एल्गार – गोंड राजाल गोंड राणी ट्रायबल फॅशन शो SEASON-2
सडक अर्जुनी (जि. गोंदिया):
गोंडी समाजाच्या राजसत्ता, शौर्य आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचा इतिहास पुन्हा एकदा देशपातळीवर गर्जना करणार आहे. “गोंड राजाल गोंड राणी ट्रायबल फॅशन शो – SEASON-2 (बल फराम शा राणी ट्रायबल)” हा राष्ट्रीय दर्जाचा भव्य कार्यक्रम दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी सडक अर्जुनी येथे होत असून, हा कार्यक्रम म्हणजे केवळ शो नसून गोंडी अस्मितेचा निर्णायक एल्गार आहे.
या ऐतिहासिक उपक्रमाचे नेतृत्व कुळे प्रिया चंदन टेकाम (रॉयल लेडी नागपूर / उशीखेडा, शेंडा सोशल वर्क) करत असून, त्यांच्या मजबूत टीममध्ये पूनम टेकाम, सपना चांदेकर,अंशूल पंधरे व समीर धुर्वे हे सक्रिय टीम मेंबर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. या संपूर्ण टीमच्या एकजुटीमुळेच हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आकार घेत आहे.
गोंडी समाज म्हणजे दुर्बलता नव्हे, तर स्वतंत्र ओळख, स्वराज्याची परंपरा आणि लढवय्या संस्कृती आहे. गोंड राजे–राणी, वीर योद्धे, गोंडी भाषा, लोकनृत्य, वेशभूषा आणि जीवनमूल्ये यांचे प्रभावी सादरीकरण या शोमधून होणार असून, गोंडी समाजाचा आवाज आता कुणीही दाबू शकत नाही, हा ठाम संदेश देशभर पोहोचवला जाणार आहे.
महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडिशा, बिहार आदी राज्यांमधून विद्यार्थ्यांचा व युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला जात असून, हा प्रतिसाद म्हणजे गोंडी समाज एकवटला आहे, जागा झाला आहे आणि नेतृत्वासाठी पुढे सरसावला आहे याचे स्पष्ट द्योतक आहे.
SEASON-2 अधिक भव्य, अधिक धारदार आणि अधिक आक्रमक स्वरूपात सादर होणार असून, यामुळे सडक अर्जुनी हे गोंडी अस्मितेचे राष्ट्रीय केंद्र म्हणून ओळखले जाईल. इतिहासात दडपलेला गोंडी आवाज आता शांत बसणार नाही — गोंडी समाज स्वतःची ओळख स्वतः घडवत आहे, हा निर्धार या मंचावरून व्यक्त होणार आहे. कार्यक्रमास गोंदिया जिल्ह्यातील व सडक अर्जुनी तालुक्यातील नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन चंद्रमुनी बनसोड महाराष्ट्र पत्रकार संघ सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष यांनी केले आहे.

