मोरगाव अर्जुनी – वडसा (देसाईगंज) – ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्ग 543 वर खड्ड्यांचे साम्राज्य; आणखी किती बळी जाणार?
गोंदिया, = गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 543 (NH-543) सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून मोरगाव अर्जुनी ते वडसा (देसाईगंज) आणि पुढे ब्रह्मपुरीपर्यंतचा प्रवास नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील देवरी, कोरची, कुरखेडा, वडसा (देसाईगंज) मार्गे ब्रह्मपुरीपर्यंत जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय मार्ग आहे. �
रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबरी थर आणि पावसाळ्यापूर्वीच झालेली दयनीय अवस्था यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दुचाकीस्वार, प्रवासी बस, रुग्णवाहिका आणि मालवाहू वाहनांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, “राष्ट्रीय महामार्गावर इतकी वाईट परिस्थिती असताना संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी नेमके काय करत आहेत?” निवडणुकीच्या वेळी विकासाच्या गप्पा मारणारे आमदार आणि खासदार आता मात्र या गंभीर प्रश्नावर मौन बाळगून असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो, मग रस्त्यांची ही अवस्था का? खड्डे बुजविण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी करून प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“आणखी किती लोकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन महामार्ग सुरक्षित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
— मुन्नासिंह ठाकूर, MTV News 9

