कालपत्री जंगलात युवकाचा रहस्यमय मृत्यू; वाघाचा हल्ला की घातपात? वनविभागाच्या अहवालाकडे लक्ष
गोरेगाव, दि. ५ जून (प्रतिनिधी)
गोरेगाव तालुक्यातील कालपत्री गावालगतच्या जंगल परिसरात २७ वर्षीय युवकाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा प्रकार वाघाच्या हल्ल्याचा आहे की अन्य काही घातपाताचा, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुलेश्वर संतोष खरकाटे (वय २७, रा. कालपत्री) हा युवक गुरुवारी सकाळी जंगलात डारा (जंगलातील साहित्य) आणण्यासाठी गेला होता. मात्र सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शोध घेण्यासाठी गेलेले त्याचे वडीलही उशिरापर्यंत परत न आल्याने गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान, कालपत्री-मुरदोली सीमेवरील जंगलात युवकाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता वाघाच्या हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे कालपत्री, गुडकायम, मुरदोली व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या गावांतील नागरिकांनी वनविभागाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत माहिती जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
वनविभागाच्या अहवालानंतरच सत्य समोर येणार
युवकाचा मृत्यू नेमका वाघाच्या हल्ल्यात झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबतचा उलगडा वनविभाग व शवविच्छेदनाच्या अधिकृत अहवालानंतरच होणार आहे. तोपर्यंत या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.
छायाचित्र ओळ :
कालपत्री-मुरदोली जंगल परिसरात युवकाचा मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली

