पर्यावरण दिनाचा फज्जा!
झाडे नाहीत, फक्त फांद्या; वृक्षारोपणाच्या नावाखाली फोटोबाजी?
सडक अर्जुनी, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मात्र सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार (दल्ली) येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) व सावित्रीबाई फुले ग्रामसंस्था यांच्या वतीने वृक्षारोपण केल्याचा गाजावाजा करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात झाडे लावण्याऐवजी केवळ झाडांच्या फांद्या जमिनीत खोचून फोटो काढण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पर्यावरण दिनानिमित्त मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे फोटो आणि माहितीही प्रसारित करण्यात आली. मात्र काही जागरूक नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे एकही जिवंत रोप आढळून आले नाही. अनेक ठिकाणी केवळ झाडांच्या तोडलेल्या फांद्या जमिनीत रोवण्यात आल्याचे दिसून आले.
यामुळे शासनाच्या पर्यावरण संवर्धन मोहिमेचा उद्देशच हरवला असून, केवळ फोटो काढून कागदोपत्री काम पूर्ण केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पर्यावरण दिनाच्या नावाखाली अशी दिशाभूल करणारी कृती करून प्रशासन आणि शासनाची फसवणूक करण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच वृक्षारोपणासाठी खर्च झालेला निधी, लावण्यात आलेल्या रोपांची संख्या आणि त्याची प्रत्यक्ष पडताळणी याबाबत माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
गावातील काही नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितले की, “पर्यावरण दिन म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा दिवस आहे. मात्र अशा प्रकारे फांद्या लावून फोटो काढणे म्हणजे पर्यावरण संरक्षणाची चेष्टा आहे.”
आता या प्रकरणात संबंधित विभाग व प्रशासन काय भूमिका घेतात आणि प्रत्यक्ष चौकशी होते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांचा सवाल
“पर्यावरण दिनी खरोखर झाडे लावली की फक्त फोटो काढण्यासाठी फांद्या खोचल्या? शासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई होणार का?”
— MTV News9 | सडक अर्जुन

