लाखोंचा निधी वाया; तहसीलदार निवासस्थान पडून, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड
सहा वर्षांपासून रिकामी इमारत; झाडी वाढून झाली शोभेची वास्तू
सडक अर्जुनी (ता. प्र.) : तहसील कार्यालयालगत तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या निवासासाठी 2017-18 या कालावधीत लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली शासकीय इमारत गेल्या सहा वर्षांपासून वापराअभावी पडून आहे. परिणामी शासनाचा निधी अक्षरशः वाया गेला असून संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तहसीलदार कार्यालयाजवळ अधिकारी उपलब्ध राहावेत, नागरिकांची कामे तातडीने मार्गी लागावीत आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढावी या उद्देशाने ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या उद्देशाला पूर्णतः हरताळ फासला गेला आहे. इमारत तयार होऊन अनेक वर्षे उलटून गेली तरी एकाही तहसीलदाराने येथे वास्तव्यास राहण्याची तयारी दर्शवली नाही.
सध्या या इमारतीभोवती मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढली असून परिसर जंगलमय झाला आहे. इमारतीची दुरवस्था होत असून शासकीय मालमत्तेची हानी होत आहे. मागील सात-आठ वर्षांत तब्बल सहा तहसीलदार बदलून गेले, परंतु शहरातील सोयीसुविधांचा हवाला देत कोणीही येथे राहण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली आहे.
गरीब जनतेच्या करातून उभारलेली ही इमारत वापराअभावी पडून असताना संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन इमारतीचा वापर सुरू करावा, अन्यथा ती इमारत दुसऱ्या शासकीय कामासाठी वापरात आणावी, अशी मागणीही आता जोर धरत आहे.

