पाठ्यपुस्तकातील कवितेचे कवी थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला
सरावन महिन्यात’ कवितेचे कवी लोकराम शेंडे यांची जांभळी शाळेला स्नेहभेट
सडक अर्जुनी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभळी येथे इयत्ता चौथीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील ‘सरावन महिन्यात’ या लोकप्रिय कवितेचे कवी श्री. लोकराम शेंडे यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. आपल्या पाठ्यपुस्तकात वाचलेली कविता ज्या कवींनी लिहिली, त्या कवीची प्रत्यक्ष भेट घेण्याची अनोखी संधी विद्यार्थ्यांना मिळाल्याने शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी शाळेच्या वतीने कवी श्री. लोकराम शेंडे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक किशोर डोंगरवार, शिक्षक सचिन मोहुर्ले व राजेश सोनवाने यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना कवी लोकराम शेंडे यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळेपणाने संवाद साधला. कविता कशी सुचते, कवितेच्या निर्मितीमागे कोणत्या भावना व अनुभव असतात, लेखनासाठी निरीक्षणशक्तीचे महत्त्व काय आहे, तसेच वाचनाची सवय सर्जनशीलतेला कशी दिशा देते, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनीही कवी श्री. शेंडे यांना कविता लेखन, साहित्य, निसर्ग निरीक्षण आणि त्यांच्या लेखनप्रवासाविषयी विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे देत त्यांच्याशी हितगुज केले. पुस्तकातील कविता वाचण्यापासून ते ती कविता लिहिणाऱ्या कवीशी प्रत्यक्ष संवाद साधण्यापर्यंतचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी निश्चितच अविस्मरणीय ठरला.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्य, वाचन आणि लेखनाविषयी अधिक कुतूहल निर्माण झाले. पाठ्यपुस्तकातील धड्यांमागील लेखक-कवींच्या प्रत्यक्ष भेटीमुळे शिक्षण अधिक जिवंत, आनंददायी आणि अनुभवाधारित होते, याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक धम्मदीप साखरे, भुवन बागडे, जितेंद्र कवरे, श्यामा कुंडगीर, माया तांदळे तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. शाळेच्या वतीने कवी श्री. लोकराम शेंडे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
“पाठ्यपुस्तकातील कविता आज पुस्तकातून बाहेर आली आणि विद्यार्थ्यांसमोर तिचा कवी उभा राहिला!” हा अनुभव जांभळी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणातील एक अविस्मरणीय साहित्यिक पर्व ठरला.
“आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात असलेल्या कवितेच्या कवीशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अशा साहित्यिक व्यक्तींच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि सर्जनशीलतेची आवड निर्माण होते. कवी श्री. लोकराम शेंडे यांनी विद्यार्थ्यांसाठी वेळ देऊन त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला, याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.”
किशोर डोंगरवार मुख्याध्यापक
“पाठ्यपुस्तकातील माझी कविता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधताना मला खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील उत्सुकता आणि त्यांच्या प्रश्नांमधून साहित्याविषयीची आवड जाणवली. विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावे, निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करावे आणि स्वतःच्या कल्पनांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न करावा.”
लोकराम शेंडे कवी

