कातलवाहीच्या जंगलात मशरूमच्या वैविध्याचा शोध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जैवविविधता सर्वेक्षण; ६० ते ७० प्रकारांची प्राथमिक नोंद

शिक्षा

कातलवाहीच्या जंगलात मशरूमच्या वैविध्याचा शोध

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जैवविविधता सर्वेक्षण; ६० ते ७० प्रकारांची प्राथमिक नोंद

सडक अर्जुनी= , दि. २४ : कातलवाही कक्ष क्रमांक ६७१ मधील वनक्षेत्रात मशरूमच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी विशेष सर्वेक्षण करण्यात आले. मशरूम तज्ज्ञ मा. शीतल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. वनपरिक्षेत्र अधिकारी, देवरी (वन्यजीव), क्षेत्र सहाय्यक पांढरवाडी, नियतक्षेत्र अधिकारी व्ही.आर.सोडगीर, वनरक्षक व वन विभागातील कर्मचारी यांच्या संयुक्त सहभागातून हे सर्वेक्षण पार पडले.

या सर्वेक्षणादरम्यान कक्ष क्रमांक ६७१ मधील विविध वनभागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. जंगलातील पालापाचोळा, कुजलेले लाकूड, ओलसर जमीन, सेंद्रिय पदार्थ तसेच इतर नैसर्गिक अधिवास असलेल्या ठिकाणी आढळणाऱ्या मशरूमचे बारकाईने निरीक्षण करून त्यांची नोंद करण्यात आली. या पाहणीत अंदाजे ६० ते ७० विविध मशरूम प्रकार आढळून आल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली.

मशरूम तज्ज्ञ शीतल चौधरी यांनी यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मशरूमच्या विविध प्रजातींची ओळख, त्यांचे अधिवास, वाढीसाठी आवश्यक नैसर्गिक परिस्थिती आणि पर्यावरणीय महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. जंगलातील मृत व कुजलेल्या वनस्पतीजन्य पदार्थांचे विघटन करून त्यातील पोषक घटक पुन्हा जमिनीत मिसळण्याच्या प्रक्रियेत मशरूमची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे वन परिसंस्थेतील पोषकचक्र, मातीची सुपीकता आणि जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी मशरूम महत्त्वाचे घटक आहेत, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

कातलवाहीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात मशरूमची विविधता आढळून येणे ही या वनक्षेत्रातील समृद्ध जैवविविधतेची महत्त्वपूर्ण नोंद मानली जात आहे. या सर्वेक्षणामुळे परिसरातील मशरूमच्या प्रजातींचे दस्तऐवजीकरण करण्यास मदत होणार असून, भविष्यात त्यांच्या शास्त्रीय ओळख व वर्गीकरणासाठी हा प्राथमिक अभ्यास उपयुक्त ठरणार आहे.

वनक्षेत्रातील जैवविविधतेचे संवर्धन आणि त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेले हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरले असून, अशा प्रकारच्या सर्वेक्षणातून जंगलातील अदृश्य पण अत्यंत महत्त्वाच्या जैवसंपदेचा शोध घेण्यास मदत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *