डीपीजवळ वीजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; शेतकरी बालंबाल बचावला   

शिक्षा

डीपीजवळ वीजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; शेतकरी बालंबाल बचावला

 ब्राम्हणी खडकी येथील पाणी टाकीजवडील घटना 

ब्राह्मणी खडकी : येथील पाण्याच्या टाकीजवळील शेतात विद्युत डीपीजवळ वीजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकरी यशवंत वाढई हे बालंबाल बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत वाढई हे आपल्या म्हशीसह शेत परिसरात असताना विद्युत डीपीजवळ म्हशीला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. यात म्हशीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत शेतकरी यशवंत वाढई यांचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी गंगाधर सोनवणे व पुरुषोत्तम भंडारकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने वीजपुरवठा बंद करून वीजेचा धक्का नेमका कशामुळे लागला, याची पाहणी सुरू केली. तसेच पोलिस व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. विद्युत डीपी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

नुकसानभरपाईची मागणी

मृत म्हशीची किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे सांगत, झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई महावितरणने द्यावी, अशी मागणी शेतकरी यशवंत वाढई यांनी केली आहे. घटनेचा पंचनामा व वीज विभागाच्या तपासणीनंतर पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *