सडक अर्जुनी तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका; प्रति क्विंटल 700 रुपयांचा तोटा
सडक अर्जुनी
तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड करण्यात आली असून सुमारे 4 हजार एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी मका घेतला आहे. सध्या कापणी सुरू असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका विक्रीसाठी तयार करत आहेत. मात्र शासनाचे मका खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
शासनाच्या केंद्रावर मका प्रति क्विंटल सुमारे 2400 रुपये दराने खरेदी होणार असताना खाजगी व्यापारी केवळ 1700 रुपये दराने मका खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तब्बल 700 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील एकूण 19 हजार हेक्टर शेतीपैकी सुमारे 4 हजार एकर क्षेत्रावर मका लागवड झाली आहे. विजेचा अपुरा पुरवठा (फक्त 8 तास) आणि धान पिकासाठी लागणारे अधिक पाणी यामुळे शेतकरी मका पिकाकडे वळले आहेत. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून मक्याची निवड करण्यात आली.
शासनाकडून मका खरेदीसाठी तालुक्यात दोन केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून सौंदड आणि गिरोला येथे खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी या केंद्रांवर ऑनलाईन नोंदणीही केली आहे. मात्र प्रत्यक्ष खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
खरेदी केंद्र सुरू न होण्यामागे मुख्य अडचण म्हणजे सौंदड येथील शासकीय गोदामात आधीच तांदूळ व गहू साठवलेला असल्याने मक्याची मोजणी व साठवणूक करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच खाजगी गोदामांमध्येही आवश्यक सुविधा नसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, कापणी झालेला मका दोन दिवस उन्हात वाळवून शेतकरी तातडीच्या गरजेमुळे खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात विक्री करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन खरेदी केंद्र सुरू करावे आणि भात गिरणी तसेच देवरी खरेदी-विक्री केंद्राप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने मका खरेदी सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गंगाधर परशुराम कर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना होणारा आर्थिक तोटा टाळण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घेणे गरजेचे असल्याची भावना शेतकरी बांधवांकडून व्यक्त होत आहे.

