कोहमारा येथे आमसभा शांततेत पार पडली; उड्डाणपुलाची माहिती देण्याची ग्रामस्थांची मागणी
कोहमारा, ता. सडक अर्जुनी : ग्रामपंचायत कोहमारा येथे सरपंच प्रतिभाताई देवीदास भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमसभा शांततापूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी ग्रामविकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी आपल्या समस्या, मागण्या तसेच गावातील विविध विकासकामांबाबत मुद्दे मांडले. संबंधित विषयांवर चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
दरम्यान, कोहमारा येथे प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी विशेष मागणी केली. उड्डाणपुलाची उभारणी नेमकी कोणत्या पद्धतीने होणार आहे, त्याचे नियोजन कसे आहे, वाहतूक व्यवस्था कशी राहणार आहे तसेच कामाचा कालावधी याबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
यासाठी सीमा कन्स्ट्रक्शन कंपनीचे संबंधित कर्मचारी तसेच NHAIचे अधिकारी यांना ग्रामसभेत बोलावून उड्डाणपुलाच्या बांधकामाची संपूर्ण माहिती ग्रामस्थांसमोर देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. उड्डाणपुलाच्या कामामुळे गावातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच वाहनधारकांवर होणाऱ्या परिणामांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
आमसभेदरम्यान ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.पो: पा: उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार न घडता सभा शांततेत पूर्ण झाली. ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल सरपंच प्रतिभाताई देवीदास भेंडारकर यांनी आभार मानले.

