जांभळीच्या वनमजुरांचा रोजगार हिरावला! वन विकास महामंडळाविरोधात ग्रामस्थांचा संताप
. सडक अर्जुनी: वर्षानुवर्षे वनक्षेत्रातील कामांवर उदरनिर्वाह करणाऱ्या जांभळी व परिसरातील वनमजुरांच्या हाताला आता कामच उरले नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या निर्णयामुळे वन विकास महामंडळाच्या जांभळी-१ व जांभळी-२ क्षेत्रातील विविध कामे ठप्प झाली असून, “मजुरांचा रोजगार बंद करून त्यांच्या कुटुंबांना उपाशी ठेवणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
जांभळी ग्रामपंचायतीने याबाबत वन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदन देत निष्कासनाची कामे तातडीने सुरू करून स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे.
जांभळी परिसरातील १५ ते २० गावांमधील शेकडो मजुरांचा उदरनिर्वाह वनक्षेत्रातील कामांवर अवलंबून आहे. पूर्वी वन विकास महामंडळाच्या माध्यमातून निष्कासन, जंगल साफसफाई, गवत कापणी, रोपवन, रस्ते दुरुस्ती, बांबू कटाई, OWR, IWL, AWC यांसह विविध कामे नियमितपणे मिळत होती. त्यामुळे स्थानिक मजुरांना गावातच रोजगार मिळत होता.
मात्र, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील ‘युनिफाइड कंट्रोल’च्या निर्णयानंतर स्थानिक मजुरांच्या रोजगारावर गदा आली आहे. अनेक कामे बंद झाल्याने मजुरांच्या हाताला काम राहिलेले नाही. परिणामी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, रोजगाराच्या शोधात मजुरांना इतर जिल्ह्यांत व राज्यांत स्थलांतर करण्याची वेळ आली आहे.
ग्रामपंचायतीने निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, वनसंवर्धनाच्या नावाखाली स्थानिकांच्या पोटावर लाथ मारणे योग्य नाही. वनक्षेत्राच्या संरक्षणासोबतच त्या परिसरातील वर्षानुवर्षे वनावर अवलंबून असलेल्या मजुरांच्या रोजगाराचाही विचार शासनाने करणे गरजेचे आहे.
‘काम द्या, नाहीतर आंदोलन!’
स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वन विकास महामंडळाने तातडीने निर्णय न घेतल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. निष्कासनाची कामे पूर्ववत सुरू करा, स्थानिक मजुरांना रोजगार द्या आणि त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह वाचवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शासन व वन विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास जांभळी परिसरातील ग्रामस्थ व वनमजूर आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
आता वन विकास महामंडळ काय निर्णय घेते, याकडे जांभळी परिसरातील शेकडो मजुरांचे लक्ष लागले आहे.

