विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला? जंतर-मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सडक अर्जुनीत उद्या उसळणार जनआक्रोश
सडक अर्जुनी, दि. 24जुलै :
देशाच्या भविष्याचा पाया असलेल्या विद्यार्थ्यांवर जंतर-मंतर येथे झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सडक अर्जुनीत आता जनआक्रोश उसळणार आहे. शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या कथित खेळाविरोधात 24 जुलै 2026 रोजी दुपारी 1.30 वाजता भव्य शांततापूर्ण रॅली व जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोहमारा टी-पॉईंट येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून तहसील कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात येणार असून, विद्यार्थी, पालक, युवक, शेतकरी, सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आंदोलनातून NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी, NTA मध्ये व्यापक सुधारणा, दोषींवर कठोर कारवाई आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. “विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही,” असा संतप्त सूर आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
आयोजकांचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांवर लाठी चालवून त्यांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीला घातक आहे. शिक्षण हा अधिकार आहे, उपकार नाही. देशाच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना जनतेसमोर उत्तर द्यावेच लागेल.
आयोजक समस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी व समस्थ शिक्षक प्रेमी सडक अर्जुनी असून, सर्वपक्षीय जनता जनार्दन या आंदोलनात सहभागी होणार आहे.
“हा केवळ विद्यार्थ्यांचा लढा नाही, तर देशाच्या भविष्याचा लढा आहे. चला, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकजुटीने रस्त्यावर उतरूया. विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही; न्याय मिळालाच पाहिजे!” असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

