धावत्या शाळकरी ओम्नीचा दरवाजा उघडला अन् चिमुकले थेट महामार्गावर!      लिटिल एंजल पब्लिक स्कूल चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर  खजरी येथे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; एक विद्यार्थी जखमी, ग्रामस्थांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

शिक्षा

धावत्या शाळकरी ओम्नीचा दरवाजा उघडला अन् चिमुकले थेट महामार्गावर!

     लिटिल एंजल पब्लिक स्कूल चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर 

खजरी येथे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; एक विद्यार्थी जखमी, ग्रामस्थांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

सडक अर्जुनी | प्रतिनिधी

सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी येथे शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ओम्नी वाहनाचा मागील दरवाजा अचानक उघडल्याने काही चिमुकले विद्यार्थी धावत्या वाहनातून थेट राज्य महामार्गावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून, ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली.

शाळा सुटल्यानंतर काळजाचा ठोका चुकवणारी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, खजरी येथील ‘लिटिल एंजल पब्लिक स्कूल’मध्ये खजरीसह मसवानी, खोडशिवणी आणि बोथली परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेला ओम्नी वाहन क्रमांक एमएच ३५ ई १८०८ मधून घरी सोडण्यात येत होते.

वाहन गोंदिया-कोहमारा मार्गावरील राज्य महामार्ग क्रमांक ७५३ वरून जात असताना अचानक मागील दरवाजा उघडला. वाहन वेगात असल्याने काही विद्यार्थी थेट रस्त्यावर कोसळले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

ग्रामस्थांची तत्परता; विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविले

घटना लक्षात येताच खजरी येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाजूला केले. त्यानंतर डुग्गीपार पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी संबंधित वाहन ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

घटनेनंतर ग्रामस्थांकडून शाळेच्या व्यवस्थापनाबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. शाळेच्या ठिकाणी शाळेचा फलक नसल्याचे तसेच परिसर झाडी-झुडपांनी वेढलेला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

शाळेला शिक्षण विभागाची मान्यता आहे का? स्थानिक ग्रामपंचायतीची आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का? विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन अधिकृत व नियमांनुसार सुरक्षित आहे का? चालकाकडे आवश्यक परवाना व कागदपत्रे आहेत का? असे अनेक प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत.

या सर्व बाबींची संबंधित विभागांनी अधिकृत चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

महामार्गावर अवजड वाहन आले असते तर?

विद्यार्थी धावत्या वाहनातून थेट महामार्गावर पडल्याने संभाव्य दुर्घटनेची तीव्रता लक्षात येते. त्याचवेळी मागून एखादे अवजड वाहन आले असते, तर परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता होती. ग्रामस्थांनी वेळीच मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

तालुक्यातील शालेय वाहनांची विशेष तपासणी करा!

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सडक अर्जुनी तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

पोलिस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) आणि शिक्षण विभागाने पुढील बाबींची तपासणी करावी:

– वाहनाची फिटनेस स्थिती व वैध कागदपत्रे.

– वाहनाचा परवाना व विमा.

– चालकाची पात्रता आणि आवश्यक परवाना.

– वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होते का?

– शालेय वाहतुकीसंदर्भातील लागू सुरक्षा नियमांचे पालन.

हलगर्जीपणा आढळल्यास कारवाईची मागणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोष किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको; शालेय वाहतुकीच्या सुरक्षेची कठोर तपासणी आवश्यक!

   जयेंद्र राऊत संस्थापक

लिटल एंजल पब्लिक स्कूल 

फोन वर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही 

   पालक जयदेव झिंगरे घाटबोरी तेली

    संस्थापक यांना शाळेची गाडी बदली करून नवीन गाडी आणायला सांगितला तरी पण नवीन गाडी 4आणली नाही ही कार 2004 ची आहे. गाडी चे पेपर नाही.PUC नाही. इन्शुरन्स नाही. गाडी चे पेपर नाही. एखाद्या मुलाला कमी जास्त झाला असता तर जिम्मेदार कोण असता सडक अर्जुनी तालुक्यातील संपूर्ण प्रायव्हेट शाळेतील वाहनांची तपशनी करावी अशी मागणी पालकांची आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *