AGIPL कंपनीने बांधलेले उड्डाणपूल क्षतिग्रस्त; NHAIच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
साकोली–कोहमारा–देवरी मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर परिस्थिती गंभीर
सडक अर्जुनी= राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील साकोली–कोहमारा–देवरी मार्गावर AGIPL कंपनीकडून बांधण्यात आलेल्या चारही उड्डाणपुलांच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याचे समोर आले आहे. उड्डाणपुलांचे काम पूर्ण होऊन फारसा कालावधी लोटलेला नसतानाच रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नवीन उड्डाणपुलांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती धोकादायक असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने या उड्डाणपुलांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, अनुभवी ठेकेदार आणि अनुभवी अभियंते नसलेल्या कंपन्यांना मोठ्या सार्वजनिक प्रकल्पांची कामे दिल्यास बांधकामाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कंत्राटदारांची पात्रता, अनुभव आणि कामाची गुणवत्ता यांची कठोरपणे तपासणी करूनच कामे देण्याची गरज आहे.
दरम्यान, या प्रकरणी कंपनीचे जीएम प्रमोद पांडे यांच्याशी दूरध्वनीवरून विचारणा केली असता, “NHAI फक्त दंड करेल, बाकी काय करणार आहे?” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. या वक्तव्यामुळेही नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, केवळ दंडात्मक कारवाई न करता निकृष्ट कामाची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सार्वजनिक पैशातून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची अल्पावधीतच झालेली दुरवस्था गंभीर बाब आहे. त्यामुळे NHAIने चारही उड्डाणपुलांची तांत्रिक तपासणी करून बांधकामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाची जबाबदारी यांची चौकशी करावी. दोष आढळल्यास संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

