अग्रवाल कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर!
MSIDCचे काम अग्रवाल कंपनीकडे; अनुभवहीन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे वाहनचालक व जनता त्रस्त
सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामामुळे अग्रवाल कंपनीचा भोंगळ व निष्काळजी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. MSIDCचे काम अग्रवाल कंपनीमार्फत सुरू असून, कामाच्या नियोजनाचा अभाव आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्याच्या कामादरम्यान वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षित व्यवस्था, रस्त्याची देखभाल आणि वाहनचालकांच्या सुरक्षेकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काम सुरू असताना निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अपघात झाल्यास खर्च कंपनी देणार!
नागरिकांच्या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अमोल भुरे यांनी महत्त्वाचे लेखी आश्वासन दिले आहे. रस्त्याच्या सद्यस्थितीमुळे अपघात झाल्यास संबंधित व्यक्तीला लागणारा वैद्यकीय खर्च, दवाखान्याचा खर्च तसेच ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कंपनीकडून घेतली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, अपघात होण्याची शक्यता निर्माण होईल इतकी रस्त्याची परिस्थिती का निर्माण झाली? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. अपघातानंतर खर्च देण्याची हमी देण्यापेक्षा अपघात होणारच नाही, अशी सुरक्षित रस्ते व्यवस्था निर्माण करणे ही कंपनीची पहिली जबाबदारी नाही का? असा सवालही केला जात आहे.
‘हमीपत्र’ दिले, आता कामातून उत्तर द्या!
कंपनीकडून लेखी आश्वासन मिळाले असले तरी नागरिकांचा त्रास संपलेला नाही. कागदावर दिलेले आश्वासन पुरेसे नसून प्रत्यक्ष रस्त्यावर सुरक्षितता आणि दर्जेदार काम दिसले पाहिजे, अशी मागणी होत आहे.
MSIDCच्या कामावर संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन कामाची गुणवत्ता, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि कंपनीच्या जबाबदारीची पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अग्रवाल कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह; आता प्रशासन कारवाई करणार की केवळ कागदी आश्वासनावर समाधान मानणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे आंदोलन डॉ राहुल ठवरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.पंचायत समिती सदस्य. चंद्रकला शामराव ठवरे.सचिन कापगते सचिन दादा फुंडे. रामू दुर्वे.कैलास लाडे.विजय टेकाम. सरपंच कोहलगाव.सरपंच कान्हिली.व हजारोच्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते

