सौंदड उड्डाणपुलाची खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्याकडून पाहणी!
८ ऑक्टोबरला पूल सुरू करण्याचे NHAI अधिकाऱ्यांचे आश्वासन; दोन्ही बाजूंना बसथांबा उभारणार
सौंदड, ता. सडक अर्जुनी : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सौंदड येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची पाहणी करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. पुलाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून येत्या ८ ऑक्टोबर रोजी उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर जिजकार साहेब आणि साइट इन्चार्ज चापले उपस्थित होते. खासदार पडोळे यांनी संपूर्ण उड्डाणपुलाची पाहणी करून प्रलंबित कामे, गटरचे काम तसेच इतर अपूर्ण बाबींचा आढावा घेतला. उर्वरित काम दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सौंदडवासीयांना तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना नवीन बसथांबा शेड उभारण्याची मागणी करण्यात आली. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंना बसथांब्यांची व्यवस्था लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
पुलाच्या कामादरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या यावेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यावर सकारात्मक कार्यवाही करून उर्वरित काम पूर्ण करण्यात येईल आणि ८ ऑक्टोबर रोजी पूल सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन NHAI च्या अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी उपस्थित मान्यवर
तालुकाध्यक्ष मधुसूदन दोनोडे, जिल्हा बँकेचे सदस्य गंगाधर परशुरामकर, रोशन बडोले, दामोदर नेवारे, माजी सरपंच गायत्री, ग्रामपंचायत सदस्य समाधान बडोले, अनिल मेश्राम, नंदकिशोर डोंगरवार, शिवचरण शहारे, सौदड गावच्या पोलीस पाटील निंबेकर मॅडम, राजाभाऊ गुबुले, भरत पंधरे, किशोर शेंडे आदी उपस्थित होते.
आता सौंदडवासीयांचे लक्ष ८ ऑक्टोबरकडे लागले असून, उड्डाणपूल प्रत्यक्षात सुरू होतो का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

