सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला गती; ६ ऑक्टोबरपासून एका बाजूने वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

शिक्षा

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला गती; ६ ऑक्टोबरपासून एका बाजूने वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

आमदार श्री राजकुमार बडोले साहेब यांची प्रत्यक्ष पाहणी; हर्ष मोदींच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामकरणासाठी निवेदन

सौंदड 

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ (जुना क्र. ६) वरील सौंदड येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने आज महत्त्वपूर्ण हालचाली झाल्या. 

आमदार श्री राजकुमार बडोले साहेब यांनी सौंदड येथील उड्डाणपुलाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. पाहणीनंतर हर्ष मोदी यांच्या जनसेवक कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत उड्डाणपुलाचे अपूर्ण काम, वाहतूक व्यवस्था, अंडरपास, सर्व्हिस रोड तसेच सौंदड ग्रामस्थांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सुमारे सात वर्षांपासून काम प्रलंबित

ग्रामपंचायत सौंदड हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ (NH-53), जुना क्र. ६ वरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील सुमारे सात वर्षांपासून प्रलंबित असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर काम यापूर्वी राजदीप बिल्डकॉम या कंत्राटदाराकडे होते. त्यानंतर हे काम नवीन कंत्राटदाराकडे देण्यात आले असून सध्या काम सुरू आहे. मात्र, काम अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्याने सौंदडचे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, एस.टी. प्रवासी तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालक यांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

६ ऑक्टोबरपासून एका बाजूने वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने ६ ऑक्टोबरपासून नागपूरकडून रायपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पुलाच्या उजव्या बाजूने डायव्हर्जन करून सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

एका बाजूने वाहतूक सुरू झाल्यास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल आणि स्थानिक नागरिकांना होणारा त्रासही कमी होईल.

तसेच उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून दोन्ही बाजूंचा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल नामकरणाची मागणी

सौंदड गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या उड्डाणपुलास “परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल” असे नामकरण करण्यात यावे, ही ग्रामपंचायत सौंदड व ग्रामस्थांची मागणी आहे.

याच अनुषंगाने सौंदड ग्रामस्थांच्या वतीने हर्ष मोदी यांच्या पुढाकाराने आमदार राजकुमारजी बडोले यांना निवेदन देण्यात आले. या नामकरणासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करून अधिकृत नामफलक उभारण्यात यावा आणि या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

या विषयासंदर्भात आमदार राजकुमारजी बडोले हे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन सौंदड उड्डाणपुलाच्या प्रश्नावर चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अंडरपासची उंची व रुंदी वाढविण्याची मागणी

सौंदड गावाच्या दोन्ही बाजूंना जोडणाऱ्या अंडरपासची सध्याची उंची अपुरी असल्याने शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, शेतीची वाहने, शाळेच्या बस, एस.टी. बस तसेच इतर मोठी वाहने ये-जा करताना अडचणी निर्माण होत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.

त्यामुळे अंडरपासची उंची व आवश्यकतेनुसार रुंदी वाढवून तांत्रिक मानकांनुसार सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात आली. अंडरपासमध्ये आवश्यक स्लॅब, संरचनात्मक काम आणि मजबुतीकरण करावे, अशीही मागणी करण्यात आली.

अंडरपासची उंची अपुरी असल्यामुळे नागरिकांना सुमारे दीड किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत असल्याने एस.टी. बस, शाळेच्या बस आणि मोठ्या वाहनांसाठी सुलभ वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करण्यात आली.

सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीची मागणी

उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सर्व्हिस रोडची तात्काळ दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याची मागणी करण्यात आली.

सर्व्हिस रोडच्या सायडिंगवर मुरूम टाकून भराव व समतलीकरण करणे तसेच अंडरपासमधील मलबा, माती, कचरा व घाण हटवून परिसराची स्वच्छता करण्याची मागणीही करण्यात आली.

पुलावर प्रकाश व्यवस्था आणि सौंदर्यीकरण

उड्डाणपूल, अंडरपास, सर्व्हिस रोड आणि जोडमार्गावर संपूर्ण प्रकाश व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली. आवश्यक ठिकाणी पथदिवे व पोल-लाइट बसवून ते कार्यान्वित करण्याबाबतही चर्चा झाली.

यासोबतच उड्डाणपुलाची रंगरंगोटी, आकर्षक नामफलक, प्रत्येक पिलरला क्रमांक देणे तसेच पुलाखाली गार्डन व हरित पट्टा तयार करून परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी करण्यात आली.

दोन्ही बाजूंना बसस्थानकाची मागणी

सौंदडच्या दोन्ही बाजूंना बसस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यापूर्वी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार दोन्ही बाजूंना बसस्थानकाचे नियोजन करून त्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

रेल्वे गेटबाबतही चर्चा

उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत तसेच स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने रेल्वे विभागाशी समन्वय साधून रेल्वे गेटबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी मांडण्यात आली.

जनसेवक कार्यालयात सविस्तर बैठक

उड्डाणपुलाची पाहणी केल्यानंतर हर्ष मोदी यांच्या जनसेवक कार्यालयात झालेल्या बैठकीत सौंदडच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण होणे, वाहतूक सुरळीत होणे आणि स्थानिक नागरिकांना सुरक्षित व सुलभ दळणवळण सुविधा मिळणे यावर विशेष भर देण्यात आला.

सौंदड ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने यापूर्वीही या विषयासंदर्भात विविध पत्रव्यवहार, निवेदने व मागण्या करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

डिसेंबरपर्यंत दोन्ही बाजू सुरू करण्याच्या प्रयत्नांकडे लक्ष

एका बाजूने ६ ऑक्टोबरपासून वाहतूक सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याने आता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे सौंदडकरांचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या बाजूचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून संपूर्ण उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही होणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य निशाताई तोडासे, पंचायत समिती सदस्य वर्षाताई शहारे, ग्रामपंचायत सदस्य रंजना भोई, माजी सभापती अशोकजी लंजे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चरणदासजी शहारे, व्यापारी समितीचे अध्यक्ष संदीपजी मोदी सदूभाऊजी विठ्ठले, ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष हिमांशू राऊत, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळून वाहतूक सुरळीत होण्यासोबतच पुलाच्या नामकरणासह अंडरपास, सर्व्हिस रोड, प्रकाश व्यवस्था आणि सौंदर्यीकरणाच्या मागण्यांवरही पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *