शासकीय तांदूळ चोरी प्रकरणात सडक अर्जुनी कृउबाचे सचिव संजय पुस्तोडे अटकेत गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ  जिल्हा उपनिबंधक काय कारवाई करणार? याकडे लक्ष

शिक्षा

शासकीय तांदूळ चोरी प्रकरणात सडक अर्जुनी कृउबाचे सचिव संजय पुस्तोडे अटकेत

गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ

 जिल्हा उपनिबंधक काय कारवाई करणार? याकडे लक्ष

सडक अर्जुनी :

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील शासकीय गोदामातून ३६१ कट्टे तांदूळ चोरी प्रकरणात सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तथा राईस मिल संचालक संजयकुमार भैय्यालाल पुस्तोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. शासकीय सेवेत महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या जबाबदार अधिकाऱ्याचाच या रॅकेटमध्ये थेट सहभाग समोर आल्याने गोंदिया जिल्ह्यातील प्रशासकीय व सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

साकोली येथील शासकीय गोदामाच्या शटरचे नट-बोल्ट काढून चोरट्यांनी ५ लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचा तांदूळ लंपास केला होता. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातील गिरोला (हेटी) येथील रहिवासी असलेले राईस मिल संचालक आणि सडक अर्जुनी बाजार समितीचे सचिव संजय पुस्तोडे यांच्या मुसक्या आवळल्या. चोरीच्या शासकीय तांदळाची खरेदी, साठवणूक आणि विक्रीच्या जाळ्यात पुस्तोडे यांची मुख्य भूमिका असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या कारवाईत पोलिसांनी पिकअप वाहनासह ५० टक्के तांदूळ जप्त केला आहे.

धान खरेदी केंद्रांचा कारभारही संशयाच्या भोवऱ्यात

संजय पुस्तोडे हे केवळ कृउबा समितीचे सचिव नसून, तालुका शेतकी खरेदी-विक्री समिती देवरी अंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील धान खरेदी केंद्र तसेच ‘माँ वैष्णवी बहुउद्देशीय सहकारी संस्था गिरोला’ या दोन्ही धान खरेदी केंद्रांचा कारभार स्वतःच सांभाळतात. बाजार समितीकडून नियमित वेतन घेत असूनही ते कार्यालयात सातत्याने गैरहजर असायचे, अशाही तक्रारी आहेत. आता थेट शासकीय तांदूळ चोरीच्या गुन्ह्यात त्यांना अटक झाल्यामुळे त्यांनी चालवलेल्या धान खरेदी केंद्रांमधील कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निलंबनाची टांगती तलवार

शासकीय व निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्याला पोलीस कोठडीत २४ तासांपेक्षा अधिक काळ ठेवल्यास तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यामुळे चोरीच्या गुन्ह्यात गजाआड गेलेले सचिव संजय पुस्तोडे यांच्यावर जिल्हा उपनिबंधक गोंदिया आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ तात्काळ निलंबनाची कुऱ्हाड चालवणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *