वन्यजीव सप्ताहानिमित्त शेंडा येथे जनजागृती रॅली; निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
शेंडा, ता. देवरी : वन्यजीव सप्ताहानिमित्त नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत वन्यजीव विभाग, देवरी यांच्या वतीने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा, शेंडा येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले, तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
निबंध व चित्रकला स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला ५०० रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला ३०० रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला २०० रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन, वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
त्यानंतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून गावातील नागरिकांना वन व वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. मानवी जीवन आणि निसर्ग यांचा अतूट संबंध असून, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनसंपदा व वन्यजीवांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांपर्यंत पोहोचविला.
वन व वन्यजीव संवर्धनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मा. वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी क्षेत्र सहाय्यक वर्षा राहिले मॅडम, व्ही. आर. सोडगीर, माधव मुसळे, एस. एस. हटवार, रंजीत बडोले तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी व्ही. आर. सोडगीर यांनी विद्यार्थ्यांना वनांचे महत्त्व, वन्यजीवांचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल, जंगल संवर्धन आणि मानवी जीवनासाठी निसर्गाची आवश्यकता याविषयी सविस्तर माहिती दिली. वनांचे संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांनीही पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजून घेऊन समाजात जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावात वन व वन्यजीव संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

