डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटर उभारण्याचे चे उद्दिष्ट पूर्ण व्हावे : राजकुमार बडोले
संशोधन केंद्रासह बिज़नेस सेंटर व्यापक स्तरावर सुरू करणे गरजेचे : राजकुमार बडोले
सडक अर्जुनी प्रतिनिधी /विद्यमान आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेच्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटरच्या विकासाबाबत महत्वाचा प्रश्न उपस्थित करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि इतर महानुभावांच्या विचारांना जगासमोर आणण्याच्या उद्देशाने हे सेंटर उभारण्यात आले असल्याने सेंटरच्या मूळ हेतूला न्याय देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कन्वेंशन सेंटरच्या उद्देशांची पूर्तता व्हावी
आमदार बडोले यांनी सेंटरच्या देखभालीसाठी समता प्रतिष्ठानला जबाबदारी देण्याची आणि विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली. त्यांच्या मते, हे सेंटर अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी आणि संशोधन केंद्र म्हणून कार्यान्वित होणे आवश्यक आहे. त्यांनी ४० फुटांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचेही उल्लेख केले, जे प्रस्तावित असूनही पूर्ण झालेले नाही.
सरकारचे सकारात्मक उत्तर
मंत्री संजय शिरसाठ यांनी उत्तर देताना सांगितले की, सरकारचा या सेंटरला बिझनेस सेंटर म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. मात्र, भाड्याच्या मुद्द्यामुळे योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने रिव्यू घेऊन नव्याने निविदा काढण्यात येईल. तसेच सेंटरमध्ये संशोधन केंद्र असून, विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करणे ही प्राथमिकता आहे. जगातील कोणत्याही विषयावर संशोधन करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करण्याची शासनाची मानसिकता आहे. पैशाची कमतरता होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आणि मागील वर्षी २० कोटींची तरतूद होती, तर या वर्षी ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे असे सांगितले. सोबतच मंत्री शिरसाठ यांनी सर्व लोकप्रतिनिधींना एकत्रित करून बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
कन्वेंशन सेंटरचे वैशिष्ट्ये
नागपूरच्या कांपटी रोडवर उभारलेले हे सेंटर डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचा भाग आहे. यात २५०० आसनक्षमतेची शिल्पकला वेदिका, प्रेस रूम, कॅफेटेरिया आणि मल्टिमीडिया प्रोजेक्शन यंत्रणा आहे. विविध कार्यक्रम, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी हे सेंटर आदर्श ठिकाण आहे.
राजकुमार बडोले यांचा पुढाकार
मंत्री असताना राजकुमार बडोले यांनी या कन्वेंशन सेंटरसाठी सक्रिय पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नाने सेंटर उभारण्यात आणि विकासात महत्वाची भूमिका बजावली. याचबरोबर, लंडनमधील आंबेडकरांचे घर खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला प्रेरणा देण्यात त्यांचा वाटा आहे. बडोले यांची ही तळमळ डॉ. आंबेडकरांच्या विचारांना जनमानसात पोहोचविण्याच्या ध्येयातून प्रेरित आहे. बडोले यांच्या प्रश्नामुळे सेंटरच्या विकासाला नवे गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून हे सेंटर आणि पंचतीर्थांसारखी ठिकाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाला सन्मान देतात आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देतात असे प्रतिपादन त्यांनी केले.

