महामार्गावर मृत्यूशी झुंज… पत्रकार मुन्नासिंह ठाकूर बनले देवदूत
स्वतःच्या कारने तीन गंभीर जखमींना पोहोचविले दवाखान्यात
वाचविले प्राण
सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम देवपायली येथे मोटारसायकल आणि बस यांच्यात भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. मात्र वेळेवर मदतीला धावून आलेल्या पत्रकार मुन्नासिंह ठाकूर यांच्या तत्परतेमुळे तिन्ही जखमींचे प्राण वाचल्याची चर्चा परिसरात होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मोटारसायकल क्रमांक MH 35 AE 3032 ही मोटारसायकल अचानक बंद पडल्याने मागेहून येणारी बस क्रमांक MH 14 MH 5246 हिची जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील तिघे रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले.
अपघातातील जखमी :
राहुल मेंढे (वय 26, रा. पुराडा)
शंकरनाथ चव्हाण (वय 40, रा. पुराडा)
तोमेश्वर मडावी (वय 42, रा. पुराडा)
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असताना 108 रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने नागरिकांनी पत्रकार मुन्नासिंह ठाकूर यांना फोन करून मदतीची विनंती केली. माहिती मिळताच मुन्नासिंह ठाकूर यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.
उज्वल लांजेवार यांच्या मदतीने मुन्नासिंह ठाकूर यांनी स्वतःच्या कारमध्ये गंभीर जखमींना टाकून ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच डूगगीपार येथील बीट जमादार विजय कोटांगले घटनास्थळी दाखल झाले. तसेच महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव (डूगगीपार) येथील पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पत्रकार मुन्नासिंह ठाकूर यांनी दाखविलेल्या मानवतेचे सर्वत्र कौतुक होत असून आमदार संजय पुराम यांनीही त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले आहे.

