सडक अर्जुनीत २४ जुलै रोजी शांततापूर्ण विद्यार्थी रॅली; पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
सडक अर्जुनी, दि. २२ जुलै : देशभरात वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या संरक्षणासाठी सडक अर्जुनी येथे २४ जुलै २०२६ (शुक्रवार) रोजी दुपारी १.३० वाजता शांततापूर्ण विद्यार्थी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रॅलीद्वारे “पेपरफुटी थांबवा – विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा”, “शिक्षण हा हक्क आहे, विशेषाधिकार नाही”, “पेपरफुटी म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची फसवणूक” आणि “भविष्य विक्रीसाठी नाही” अशा घोषणांद्वारे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.
या आंदोलनातून शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता, जबाबदारी व न्यायाची मागणी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येणार आहे. तसेच, समाजसेवक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
रॅली शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार असून, सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

