हार्डवेअर दुकान फोडून तांब्याच्या तारांची चोरी; ६ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त
कोहमारा येथील घटना
सडक अर्जुनी : कोहमारा पोलीस स्टेशन डूगगीपार नव्हेगावबांध टी-पॉइंट परिसरातील हार्डवेअर दुकाने फोडून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, गोंदियाच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपीकडून ६ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
फिर्यादी नंदकिशोर खुशाल कापगते, वय ३८ वर्षे, रा. कोहमारा, पो.स्टे. डूग्गीपार यांथे दिलेल्या तक्रारीनुसार, कोहमारा येथील मोटारपंप विक्री व रिवाइंडिंगच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानातून सुमारे १०० किलो तांब्याच्या तारांची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी दुर्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गौरव भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अविनाश विजय राठोड, वय २९ वर्षे, रा. अर्जुनी पुनर्वसन, गिरेोला, ता. जि. भंडारा याचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोहमारा येथील हार्डवेअर दुकानाची घरफोडी व चोरी केल्याचे तसेच नव्हेगावबांध टी-पॉइंट येथील संजय हार्डवेअर दुकानातून तांब्याच्या तारांचे बंडल चोरी केल्याचे सांगितले.
आरोपीकडून २२० किलो तांब्याची धातूची तार, किंमत १ लाख २६ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी कार, किंमत ५ लाख रुपये, असा एकूण ६ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन दुर्गीपार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गौरव भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात सपोनि अमरदीप खाडे, सपोनि अभिषेक जंगमवार, पोहेवा तुलसीदास लुटे, पोहेवा दुर्गेश तिवारी, पोहेकॉ प्रकाश गायधने, पो.शि. सुनील डहाके, पो.शि. राकेश इंदुरकर, चापोशि विलास ठाकरे तसेच दुर्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, सपोनि जावेद शेख, पोहेकॉ गुणवंत कठाणे, पोशि लांजेवार, सायबर सेलचे सपोनि देविदास ठुमके, मपोना शितल कोचे, योगेश रहिले व पोशि अनिकेत चौधरी यांनी केली आहे.

